UCO Bank Loan Scam Case and Subodh Kumar Goel : अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. युको बँकेचे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना ईडीने दिल्लीतून अटक केलं आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत ईडीने सोमवारी सांगितलं की कोलकाता येथील एका कंपनीशी संबंधित ६,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सुबोध कुमार गोयल यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सुबोध कुमार गोयल यांना १७ मे रोजी ईडीने अटक केल्यानंतर पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना २१ मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणा संदर्भातील चौकशीचा भाग म्हणून ईडीने एप्रिलमध्येच सुबोध कुमार गोयल आणि इतर काही व्यक्तींच्या मालमत्तांवर छापे टाकले होते. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
ईडीने युको बँकेचे माजी अध्यक्ष सुबोध कुमार गोयल यांना नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानावरून ६२१० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये मेसर्स कॉनकास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेडसह इतरांचा समावेश असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून हा खटला सीएसपीएलला कर्ज सुविधा मंजूर करणे आणि त्यानंतर ६,२१० कोटी रुपयांच्या कर्ज निधीचे (व्याजाशिवाय) वळवणे आणि हस्तांतरणाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या मते सुबोध कुमार गोयल यांच्या युको बँकेच्या सीएमडी म्हणून कार्यकाळात सीएसपीएलला मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर करण्यात आलं होतं. त्यानंतर कर्जदार गटाने निधी वळवला आणि त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकरणात गोयल यांना बेकायदेशीर लाभ मिळाल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात ईडी अधिकाऱ्यांना असं आढळून आलं की गोयल यांना रोख रक्कम, स्थावर मालमत्ता, लक्झरी वस्तू, हॉटेल बुकिंग आणि निधीचा बेकायदेशीर स्रोत लपवण्यासाठी शेल कंपन्या, बनावट व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्यांद्वारे पाठवलेल्या इतर प्रकारच्या माध्यमातून पैसे मिळाले. तसेच २२ एप्रिल रोजी ईडीने गोयल यांच्या निवासस्थानावर आणि इतर मालमत्तांशी संबंधित छापे टाकले होते. तसेच गोयल यांना मिळालेली बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली होती.