छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री आणि जनता काँग्रेस छत्तीसगढचे (जे) प्रमुख अजित जोगी यांना शनिवारी हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवलं होतं. परंतु रविवारी पुन्हा त्यांची प्रकृती गंभीर झाली असून ते कोमात गेल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

शनिवारी सकाळी नाश्ता करत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यातर त्यांच्या पत्नीने आणि घरातील इतर कर्मचाऱ्यांनी जोगी यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं. परंतु रविवारी त्यांची प्रकृती खालावत गेली आणि ते कोमात गेले. एएनआयनं रायपुरमधील श्री नारायणा रुग्णालयाच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. पुढील ४८ तास हे महत्त्वाचे असून त्यांचं शरीर औषधांना कसा प्रतिसाद देत आहे हे पाहिलं जाणार असल्याची माहिती रुग्णालाकडून देण्यात आली.

शनिवारी अजित जोगी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मुलगा अमित जोगी यांनी आपल्या वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ट्विटरवरून दिली होती. “अडीच कोटी छत्तीसगढवासीयांच्या प्रार्थना आणि देवावरच सर्वकाही अवलंबून आहे. ते एक योद्धा आहेत. ते लवकर बरे होऊन परततील असा आम्हाला विश्वास आहे. पुन्हा एकदा ते या परिस्थितीला हरवून बाहेर येतील. औषधांसोबत त्यांना सर्वांच्या प्रार्थनेचीही आवश्यकता आहे,” असं अमित जोगी म्हणाले होते.

कोण आहेत अजित जोगी?

राजकारणात येण्यापूर्वी अजित जोगी यांनी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसंच ते तहसीलदार या पदावर कार्यरत होते. १९८८ च्या जवळपास त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती येण्यापूर्वी त्यांनी खासदार म्हणूनही काम केलं आहे. छत्तीसगढच्या निर्मितीनंतर त्यांनी २०००- २००३ या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली होती. २०१६ मध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी जनता काँग्रेस छत्तीसगढ असा आपला पक्ष स्थापन केला होता.