scorecardresearch

“हिजाब आवश्यक आहे की नाही हे मौलवी ठरवतील, न्यायाधीश नाही”; माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचं विधान

हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.

karnataka hijab row government AG says no restriction on wearing hijab on campus
(Express photo by Jithendra M)

गेल्या काही दिवसांपासून देशभरात शिक्षण संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वादंग सुरूच आहे. या प्रकरणी न्यायालयाने निकाल देऊनही यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येतच आहेत. काहींनी न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलं असलं तरी काहीजण मात्र या निकालावर निराश आहेत. भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी हेही या निकालावर नाराज असल्याचं दिसून आलं आहे.


कुरेशी यांनी हिजाबप्रकरणी आपली भूमिका मांडली आहे. जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, कुरेशी म्हणाले, “हिजाब कुरानचा भाग नाही, पण मुलींनी शालीन कपडे परिधान करावेत हे सांगण्यात आलं आहे. शाळेच्या गणवेशामध्ये शिखांची पगडी आणि सिंदूर लावण्याची परवानगी आहे, मग हिजाब घालण्यास काय हरकत आहे? हिजाब आवश्यक आहे की नाही हे मौलवी ठरवतील, न्यायाधीश नाही”.

हेही वाचा – “शिकलेल्या हिंदू मुली मुस्लीम मुलांना जाळ्यात ओढतात”; लव जिहादबद्दल माजी निवडणूक आयुक्तांचं विधान


याच अनुषंगाने त्यांनी लव जिहादप्रकरणीही भाष्य केलं आहे. ते म्हणाले,”लव जिहाद हा एक प्रोपगंडा आहे. यात मुस्लीम मुलींना अधिक धोका आहे. कारण त्यांच्या नजरेतून पाहिलं तर शिकलेल्या हिंदू मुली मुस्लीम मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात. अशा परिस्थितीत लव जिहादमुळे मुस्लिमांना अधिक नुकसान होतं”.


हिजाब प्रकरणी न्यायालयाचा निकाल काय?


हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former chief election commissioner sy kureshi on hijab row karnataka high court vsk

ताज्या बातम्या