पीटीआय, बंगळूरु
कर्नाटकमध्ये सत्तेवर आल्यानंतर, निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिलेल्या पाच हमींसाठी अटी घालून काँग्रेस मतदारांची फसवणूक करत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज बोम्मई यांनी सोमवारी केला.सत्ताधारी काँग्रेस पक्ष आश्वासन दिल्यानुसार या हमींची पूर्तता करेल की नाही याबद्दल शंका व्यक्त करताना, त्यांचे खरे रंग काही दिवसांत उघड होतील, असे माजी मुख्यमंत्री असलेले बोम्मई म्हणाले.
‘मंत्र्यांनी केलेली निरनिराळी वक्तव्ये पाहिली तर असे वाटते, की त्यांनी एक म्हटले आणि ते दुसरेच काही करणार आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळी, कुठल्याही अटींबाबत न बोलता त्या हमी सर्वासाठी मोफत राहतील असे ते म्हणाले होते’, याचा बोम्मई यांनी उल्लेख केला.तत्त्वत: मंजुरीच्या आदेशातही या हमी सर्वासाठी असतील असे नमूद केले होते. मात्र आता, त्या केवळ पात्र लोकांना लागू असतील, सर्वाना नाही अशी वक्तव्ये करण्यात येत आहेत, असे बोम्मई यांनी सांगितले.
‘असे बदल करून काँग्रेसने लोकांना धोका दिला आहे. कर्नाटकच्या लोकांनी या हमीच्या आधारे त्यांना सत्ता दिली, मात्र त्याला प्रतिसाद न देता ते पूर्वीच्या (भाजप) सरकारच्या आश्वसनांबद्दल बोलत आहेत. काँग्रेसचे लोक देत असलेल्या लंगडय़ा सबबी पाहता ते या हमी पूर्णपणे अमलात आणणार नाहीत असे संकेत मिळतात’, असेही बोम्मई म्हणाले.