एक्सप्रेस वृत्त, चंडीगड : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू शनिवारी पतियाळा न्यायालयाला शरण गेले. त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यांना १९८८ ला रस्त्यावर झालेल्या वाद-हाणामारीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गुरुनाम सिंग या ६५ वर्षीय व्यक्तीचा सिद्धूंशी झालेल्या हाणामारीत मृत्यू झाला होता.

सिद्धू याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सिद्धू यांच्यासाठी आठवडाभराची मुदत मागितली होती. मात्र, ती मंजूर न झाल्याने सिद्धू शरण आले. शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास पतियाळातील माता कौशल्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. सिद्धू यांना पतियाळा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार आहेत. तेथे त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी बिक्रमसिंग मजिठिया हे अमली पदार्थप्रकरणी कारावास भोगत आहेत.

आपल्या निवासाजवळ असलेल्या पतियाळा जिल्हा न्यायालयात सिद्धू शुक्रवारी नवतेजसिंग चिमा व  काही पक्षनेत्यांसह पोहोचले. शुक्रवारी सकाळी सिद्धू यांच्या निवासस्थानी त्यांचे काही समर्थक जमा झाले होते. सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू या पतियाळाच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री पोहोचल्या. सिद्धू यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी थोडा वेळ मागितला होता. त्यावर न्यायमूर्ती खानविलकर यांनी सिद्धू यांना तसा विनंती अर्ज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्याकडे करण्यास सांगितले होते.

या प्रकरणी चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केलेल्या फेरविचार याचिकेवर हा निकाल सुनावताना सर्वोच्च न्यायालयाच्या अजय खानविलकर आणि एस. के. कौल यांच्या खंडपीठाने नमूद केले, की मागील शिक्षा सुनावताना काही भौतिक तथ्ये लक्षात घ्यायला हवी होती. मात्र, त्या वेळी शिक्षा देताना ही तथ्ये लक्षात घेतली गेल्याचे दिसत नाही. त्यापैकी एक तथ्य म्हणजे या घटनेच्या वेळी २५ वर्षीय क्रिकेटपटू सिद्धूंची शारीरिक क्षमता लक्षात घेतली गेली नाही.  

 सिद्धू यांचे सल्लागार सुरिंदर डल्ला यांनी पत्रकारांना सांगितले, की सिद्धू यांचे काही आरोग्याचे प्रश्न आहेत. त्यावर उपचारांची गरज आहे. जेणेकरून त्यांच्या पायात गाठ होणार नाही. कारागृहात त्यांच्यावर योग्य उपचार होतील की नाही, याबद्दल आम्हाला चिंता वाटते. सिद्धू हे स्वत: शरण आले असून, न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना महत्त्वाच्या व्यक्तींप्रमाणे वागणूक नको आहे. मात्र, त्यांना गरज असलेले वैद्यकीय उपचार त्यांच्यावर व्हावेत.