दिल्लीचे माजी मुख्य सचिव राकेश मेहता यांनी गळफास लावून घेत आयुष्य संपवलं आहे. राकेश मेहता १९७५ च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी होते. रविवारी नोएडा येथील सेक्टर ८२ मध्ये असलेल्या केंद्रीय विहार २ या सोसायटीत त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राकेश मेहता हे २००७ ते २०१० या कालावधीत दिल्लीचे मुख्य सचिव होते.

१९७५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी

राकेश मेहता हे १९७५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. तीन दशकांहून अधिक काळ राकेश मेहता यांनी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. २००७ मध्ये ते दिल्लीचे मुख्य सचिव झाले. त्यानंतर २०१० मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. सोमवारी लोधी घाट स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राकेश मेहता हे एक उत्तम प्रशासक होते, त्यांनी कायमच कालसुसंगत बदल स्वीकारले. नवे विचार, नव्या कल्पना यांना प्रोत्साहन दिलं. सुधारणा करण्यासाठी, नवे बदल घडवण्यासाठी ते कायम उत्सुक असत. उत्पन्नावरील कर, वीज मंडळाचं खासगीकरण, ब्लू बस हटवून कमी उंची असलेल्या बस आणणं यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता अशी आठवण त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितली.

नेमकी घटना काय घडली?

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राके मेहता यांची सुसाईड नोट सापडली आहे सुसाईड नोटमध्ये राकेश मेहता हे मानसिक आणि आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त होते असं म्हटलं आहे. राकेश मेहता यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन व्याधी होत्या. राकेश मेहता यांनी लिहिलेली सुसाईड नोट विस्तृत आहे. याबाबतचे अधिक तपशील आम्ही तूर्तास सांगणार नाही असंही पोलिसांनी सांगितलं आहे. राकेश मेहता यांनी जेव्हा आत्महत्येचं पाऊल उचललं तेव्हा ते घरात एकटेच होते. त्यांची पत्नी सुमंती मेहता या त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी देहरादूनला गेल्या होत्या. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारीही राकेश मेहतांनी सांभाळली होती

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात राकेश मेहता दिल्लीचे मुख्य सचिव होते. २०१० मध्ये जेव्हा दिल्लीत कॉमनवेल्थ गेम्स आयोजित करण्यात आले होते तेव्हा त्यांच्यावर आयोजनाची जबाबदारी होती. राकेश मेहता यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आता तपास सुरु केला आहे. सुसाईड नोट विस्तृत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या आत्महत्येमागे आजारपण हेच कारण होतं की आणखी काही याचा तपास आता पोलिसांकडून केला जातो आहे.