राष्ट्रवादीचे ‘दिल्ली विस्तारा’कडे लक्ष ; दिल्ली विधानसभेच्या माजी अध्यक्षांच्या हाती ‘घडय़ाळ’

दिल्लीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सशक्त बनली पाहिजे, त्यासाठी अधिक ताकदीने काम केले पाहिजे.

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस या प्रादेशिक पक्षांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसनेही दिल्लीसारख्या अन्य राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. ‘अनेक राज्यांमध्ये पक्षाला बळकट करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी मेहनत करत आहेत. दिल्लीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सशक्त बनली पाहिजे, त्यासाठी अधिक ताकदीने काम केले पाहिजे. देशाच्या राजधानीत पक्षाचा विस्तार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, गोवा, केरळ, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, बिहार, लक्षद्वीप, झारखंड आदी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतही राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार िरगणात उतरवले होते. मात्र पक्षाला यश मिळवता आले नाही. दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस नेते योगानंद शास्त्री यांनी बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शास्त्रींच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी पवारांनी राष्ट्रवादीच्या ‘दिल्लीतील विस्तारा’चे धोरण स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी पी. सी. चाको यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ‘राष्ट्रवादी’चे घडय़ाळ हाती बांधले होते. तिकीट न मिळाल्यामुळे काँग्रेस नेतृत्वावर नाराज झालेले शास्त्री अखेर दीड वर्षांनंतर पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. शास्त्री २०२० मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले होते.

मलिकांचे समर्थन

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सातत्याने केलेल्या आरोपांचे पवार यांनी समर्थन केले. अधिकारांचा गैरवापर होत असेल, त्याविरोधात नवाब मलिक उघडपणे बोलत असतील तर त्यात काहीही चूक नाही, असे पवार म्हणाले.

धर्माध पक्षांविरोधात पर्याय

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले की, धर्माध पक्षांविरोधात राजकीय पर्याय निर्माण केला पाहिजे. भाजपसारख्या पक्षाला सत्तेतून बाजूला करण्यासाठी जनता पर्यायाची अपेक्षा करत असेल तर विरोधी पक्षांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठही उपलब्ध असले पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने प्रयत्नशील राहील. त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचाराचा धर्माध लोक गैरफायदा घेऊ पाहात आहेत. महाराष्ट्र वा अन्य कुठल्याही राज्यामध्ये त्रिपुराच्या घटनेचे हिंसक पडसाद उमटणे योग्य नव्हे. त्यामुळे धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या पक्षांपासून सावध असले पाहिजे, असे पवार म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former delhi speaker yoganand shastri joins ncp in present of sharad pawar zws

ताज्या बातम्या