Dharmendra Pradhan NEET statement : नीट पेपरफुटीप्रकरणामुळे झालेल्या जेन झी च्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. राजीनाम्याच्या काही दिवसांनंतर धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना या घटनेवरील मौन सोडलं आहे. जेन झी ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असून ही आपलीच मुलं आहेत, असं ते म्हणाले. भुवनेश्वरमधील जीएम युनिव्हर्सिटीमध्ये ते बोलत होते. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Gen Z ही आपलीच मुले
NEET पेपर लीक प्रकरणावरून दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थी आंदोलनांनंतर, ठीक दोन आठवड्यांनी भुवनेश्वरमधील जीएम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित करताना प्रधान यांनी हे वक्तव्य केलं. त्यांनी २५ जुलै रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. प्रधान म्हणाले, “Gen Z ही आपलीच मुले आहेत. काही लोकांनी त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. माझी तेव्हा कोणतीही वैयक्तिक अडचण नव्हती. भारतात दरवर्षी किमान दोन कोटी मुले जन्माला येतात. गेल्या १० वर्षांत २० कोटी मुलांचा जन्म झाला. त्यांच्या काही आकांक्षा आहेत आणि ते भारताला ‘विश्वगुरू’ बनवतील. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नव्हते.”
धर्मेंद्र प्रधान गो बॅकच्या घोषणा
रेराखोल येथील दुसऱ्या एका बैठकीत प्रधान यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी अध्यक्ष नवीन पटनायक यांच्यावरही टीका केली. बीजेडी कार्यकर्त्यांची आंदोलने आणि गो बॅकच्या घोषणांमुळे आपण अजिबात विचलित झालो नसल्याचे त्यांनी सांगितलं. विमानतळाजवळ बीजेडीच्या युवा आणि विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा आणि ‘धर्मेंद्र प्रधान गो बॅक’ अशा घोषणांचा उल्लेख करत ते म्हणाले, “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्ही मला परत जाण्यास सांगितले तरी मी पुन्हा परत येईन. नवीन बाबू मला ओडिशातील जनतेसाठी कलंक आणि वाईट माणूस देखील म्हणतात”, असा आरोप करत प्रधान यांनी बीजेडी अध्यक्षांवर तरुणांना आपल्याविरुद्ध आंदोलनात गुंतवल्याचा ठपका ठेवला.
“मी कधी असं काही केलं आहे का ज्यामुळे ओडिशातील जनतेची मान लाजेने खाली जाईल?” असा प्रश्न त्यांनी विचारला असता, उपस्थितांमधून मोठ्या आवाजात “नाही” असं उत्तर आले. ते पुढे म्हणाले, “मी राज्यासाठी मोठे वैभव आणू शकलो नसलो, तरी माझ्या कामामुळे मी कधीही लोकांचा अपमान केला नाही. राज्याची प्रतिष्ठा मलिन होईल असं कोणतेही काम मी कधीही करणार नाही.” भगवान जगन्नाथ आणि संबलपूरची आराध्य दैवत देवी समलेश्वरी यांच्या आशीर्वादाने आपण १२ वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री झालो असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
पटनायक यांच्यावरील त्यांची ही टीका अशा व्यासपीठावरून झाली जिथे बीजेडीचे आमदार आणि ओडिशा विधानसभेतील उपनेते प्रसन्न आचार्य देखील उपस्थित होते. प्रधान म्हणाले, “बीजेडीचे आंदोलन लक्षात घेता, मी प्रसन्न भाईंशी सल्लामसलत केली होती की मी तिथे यावे का. प्रसन्न बाबूंनी मला येण्यास सांगितलं आणि माझे स्वागत केले जाईल असे आश्वासन दिले. मी त्यांची परवानगी घेऊनच येथे आलो आहे.”
