Former Goa Minister sexual assault case: गोव्यातील माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप २३ वर्षीय तरुणीने केला आहे. म्हापसा पोलिसांनी पालयेकरांच्या विरोधात लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. २०१९ ते २०२६ या काळात ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

नोकरीचे आमिष देऊन अत्याचार

नोकरीचे आमिष दाखवून दिशाभूल केली आणि जबरदस्ती अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने तक्रारीतून केला आहे. संशयिताने विश्वासातून शारीरिक संबंध ठेवले, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही तरुणी मूळ उत्तर भारतीय असून, कामाच्या शोधात गोव्यात आली होती. दरम्यान, कामाचे आमिष दाखवून दिला जाळ्यात ओढल्याचा आरोप तिने केला आहे. 

पीडिताच्या संशयिताच्या घरीच होती कामाला

३१ जानेवारी रोजी दाखल झालेल्या या प्रकरणात, म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६९, ७५ (२) आणि ३१८ (४) अन्वये विनोद पालयेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पीडित तरुणी संशयित पालयेकर यांच्या घरीच वास्तव्याला होती. याच काळत पालयेकरांनी तरूणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संशयिताने दिलेले कामाचे आमिष पूर्ण न करता फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

माजी मंत्री पालयेकर कोण आहेत?

विनोद पालयेकर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तिकिटावर शिवोली मतदारसंघातून (२०१७ – २०२२) आमदार म्हणून निवडून आले होते. २०१७ ते २०१९ या काळात त्यांच्याकडे मत्स्यद्योग आणि जलस्त्रोत खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. किनारी भागात वाढत्या अमली पदार्थ तस्करी आणि वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्यात लेट नाईट पार्टीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. 

पोलिसांनी काय सांगितले?

भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाअंतर्गत पालयेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दाखल तक्रारीनुसार तपास सुरु करण्यात आला असून, सर्व शक्यतांचा विचार केला जात आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.