कायदेशीर प्रक्रिया अनेक वर्ष रखडल्याची उदाहरणे आपण अनेकदा पाहीली आहेत. बऱ्याचदा निष्पाप व्यक्तीला त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरूंगात जावे लागल्याच प्रकरणे देखील नेहमी समोर येत असतात. मात्र एका न केलेल्या गुन्ह्यासाठी एका व्यक्तीला शिक्षा झाल्याचे आणि त्यानंतर तो निर्दोष सिद्ध झाल्याचा, एक प्रकार नुकताच समोर आला आहे.

गुजरात येथील एका व्यक्तीबरोबर हा प्रकार घडला असून त्याला अवघ्या २० रूपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात ३० वर्षांच्या न्यायालयीन लढाई चालली, आणि अखेरीस काही दिवसांपूर्वी त्याची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी या व्यक्तीचा मृत्यू झाला.

गुजरात उच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालात निर्दोष ठरवल्यानंतर या व्यक्तीने भावनिक प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, “माझ्या आयुष्यावरील कलंक आता पुसला गेला आहे. आता देवाने मला बोलावले तरी मला कोणतेही दु:ख होणार नाही.” एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिले आहे.

१९९६ मध्ये काय घडले होते?

पोलीस कॉन्स्टेबल बाबूभाई प्रजापती हे अहमदाबाद येथे तैनात होते, तेव्हा त्यांच्यावर त्यांनी २० रूपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले. ही घटना २० नोव्हेंबर १९९६ रोजी घडली. त्यानंतर १९९७ मध्ये सेशन कोर्टात त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. २००२ मध्ये त्यांच्यावरील आरोप निश्चित करण्यात आले. २००३ मध्ये साक्षीदारांची सुनावणी सुरू झाली आणि २००४ मध्ये सत्र न्यायालयाने प्रजापती यांना ४ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि ३ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

प्रजापती यांनी सेशन कोर्टाच्या निर्णयाला गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर त्यांची याचिका ही २२ वर्ष प्रलंबित राहिली, आणि अखेर या वर्षी ४ फेब्रुवारी रोजी जेव्हा या प्रकरणात निकाल आला तेव्हा त्यांना निर्दोष घोषित करण्यात आले.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने साक्षीदारांच्या जबाबामध्ये गंभीर स्वरुपाच्या विसंगती असून फिर्यादी पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे न्यायालयाने म्हटले.

प्रजापती यांची बाजू मांडणारे वकील नितीन गांधी यांनी उच्च न्ययालयाला सांगितले की हे संपूर्ण प्रकरण हे संशयावर आधारित होते. दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर प्रजापती हे त्यांच्या घरी परतले. मात्र दुसर्‍याच दिवशी त्यांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला.

त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना अजून काही काळ जगताना पाहाणे आनंददायी ठरले असते अशी भावना व्यक्त केली.

“जेव्हा ते काल ऑफिसमध्ये आले तेव्हा ते खूप आनंदी दिसत होते कारण त्यांची निर्दोष सुटका झाली होती,” असे वकिल म्हणाले.

ठमी त्यांना म्हणालो होतो की, ‘काका, तुम्ही सरकारकडून मिळणाऱ्या सर्व लाभांसाठी आता अर्ज केला पाहिजे’… त्यानंतर दुसर्‍या दिवशी मी त्यांना पुन्हा फोन केला , तेव्हा मला त्यांचा हृदयिवकाराने मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले,” असे वकील पुढे म्हणाले.