Lalit Modi Interview: आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी आयपीएलची सुरुवात करून फ्रँचाईजी क्रिकेट लीगला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. मात्र २०१० साली त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी भारतातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. आयपीएल सुरू होऊन १८ वर्ष झाली आहेत. तरीही अजूनही ललित मोदींची चर्चा होत असते. नुकतीच त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्यावर लावलेला ‘फरार’ हा शिक्का फेटाळून लावला.
ललित मोदी म्हणाले, “मी भारत सरकारला घाबरून पळालेलो नाही. भारत सरकारचे हात लांब आहेत. जर त्यांना मला पकडायचे असते तर मागेच पकडू शकले असते.” तसेच फरार असल्याचा दावाही मोदी यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, जगभरात प्रवास करत असताना भारतासारख्या जागतिक महासत्तेला टाळणे अशक्य आहे.
राहुल गांधींवर टीका
ललित मोदी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. राहुल गांधी लोकसभेतील भाषणात आणि जाहीर सभांमधून मला लक्ष्य करतात, असे मोदी म्हणाले. “भारतात नेहमीच निवडणुका सुरू असतात. त्यामुळे ते माझ्यावर हल्ला करतात. लोकांची जनभावना भडकविण्यासाठी ते माझ्या नावाचा वापर करतात. कारण मी क्रिकेटशी जोडलेलो आहे आणि क्रिकेट हा भावना जागृत करणारा खेळ आहे”, अशी टिप्पणी मोदी यांनी केली.
काँग्रेसने २००९ साली स्पर्धा होऊ दिली नाही
आयपीएलची स्पर्धा २००८ साली सुरू झाली. त्यानंतर पुढचाच हंगाम भारताबाहेर हलवावा लागला होता. २००९ साली लोकसभा निवडणुका असल्यामुळे सुरक्षेचे कारण पुढे केले गेले. त्यामुळे आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.

या निर्णयाची माहिती देताना ललित मोदी म्हणाले, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री चिंदबरम यांनी मला धमकावले होते. मी आयपीएलची स्पर्धा आयोजित करू नये, असे त्यांना वाटत होते. एकाबाजूला भाजपाशासित राज्ये आयपीएलचे सामने खेळवण्यास तयार होते. मात्र काँग्रेससाशित राज्ये सामने खेळवण्यास तयार नव्हते.
दक्षिण आफ्रिकेला संपूर्ण स्पर्धा हलविण्यापूर्वी आम्ही तब्बल १५४ वेळा स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल केला होता. शेवटी चिंदबरम यांचा आदेश आला. ते त्यावेळी खूप शक्तीशाली होते, असे ललित मोदी म्हणाले.
‘शशी थरूर यांनी धमकावले’
आयपीएलमध्ये २०१० साली नव्याने दाखल झालेल्या ‘कोची टस्कर्स केरळ’ या संघाबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. हा संघ शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्याशी संबंधित होता. ललित मोदी यांनी या संघाच्या वित्तीय रचनेवर प्रश्न उपस्थित केले होते. या संघासाठी ३५० दशलक्ष डॉलरची बोली लावण्यात आली होती.
ललित मोदी यांनी संघासाठी उभारलेल्या वित्तीय रचनेबाबत प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, ७५ टक्के भागधारक १०० टक्के निधी उभारत होते आणि ते २५ टक्के इक्विटी आणि महसूलातील १५ टक्के हिस्सा एका महिलेला मोफत देत होते. असे का? मी सुरुवातीपासून या संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शेवटी झाले तेच. दोन वर्षांनी संघ बाहेर पडला.
शशी थरूर यांच्याबाबत बोलत असताना ललित मोदी म्हणाले, या संघासाठी मला शशी थरूर यांनी फोन केला होता. त्यांनी मला सांगितले की, सुनंदा पुष्कर यांच्याबाबत काही बोलू नका. मी याचे कारण विचारले तर त्यांनी मला धमकावले. ते म्हणाले, “उद्या सरकारी यंत्रणांना तुमच्या घरी धाड टाकायला लावू.” शशी थरूर यांनी धमकावल्यानंतर मी त्यांची धमकी उडवून लावली, अशी आठवण ललित मोदी यांनी सांगितली. मी त्यांना म्हणालो, तुम्ही परराष्ट्र मंत्री असाल. पण तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने बोलू शकत नाही. यानंतर मी फोन ठेवून दिला.
पंतप्रधान मोदींबद्दल काय म्हणाले?
राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या ललित मोदींनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींबद्दलही भाष्य केले आहे. ललित मोदी म्हणाले, पंतप्रधान मोदी क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. अहमदाबादमध्ये क्रिकेट इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात त्यांचा रस होता. यावरून आमची चर्चा व्हायची. पण ती क्रिकेटपुरतीच मर्यादीत होती. आमच्यात जवळचे संबंध होते, पण ते क्रिकेट पुरतेच.
भारतात परत येणार का?
भारतात पुन्हा परतणार का? असा प्रश्न विचारला असता ललित मोदी म्हणाले की, आता माझा प्राधान्यक्रम बदलला आहे. मला स्वतःला सिद्ध करण्याची पूर्वीप्रमाणे तीव्र इच्छा राहिलेली नाही. ललित मोदी यांच्यावर आर्थिक अनियमितता आणि मनी लाँडरिंगचा आरोप ठेवला गेला होता. मात्र हे आरोप राजकीय हेतून प्रेरित केले गेले असल्याचे ललित मोदी यांनी म्हटले.
