जेएनयूचा माजी विद्यार्थी शर्जिल इमामला देशद्रोहाच्या आरोपाखाली चार वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती. आता शर्जिल इमामला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शर्जिल इमामवर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला. दिल्लीच्या जामिया परिसरात तसेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शर्जिल इमामवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने शर्जिल इमामला जामीन मंजूर केला असला तरीही शर्जिल इमाम तुरुंगात राहणार आहे. कारण २०२० च्या दिल्ली दंगलीच्या संदर्भातील कटाच्या आरोप प्रकरणात शर्जिल इमाम आरोपी आहे. दरम्यान, शर्जिल इमामला ट्रायल कोर्टाने जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र, दोषी सिद्ध झाल्यास सुनावल्या जाणाऱ्या कमाल शिक्षेपैकी अर्ध्याहून जास्त शिक्षा भोगली. त्यानुसार ट्रायल कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा : प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स टेप प्रकरणात मोठी अपडेट; खासदार रेवण्णाला उद्या भारतात आणले जाणार

या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालायत सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि मनोज जैन यांच्या खंडपीठाने शर्जील इमामला जामीन मंजूर केला. शर्जील इमाम जळपास गेल्या चार वर्षांपासून कोठडीत आहे. तर युएपीएच्या कलम १३ नुसार बेकायदेशीर कृत्यांमध्ये दोषी असलेल्या व्यक्तीला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. यातील निम्म्याहून जास्त शिक्षा त्याने तुरुंगात काढली आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

शर्जील इमाम १३ डिसेंबर २०१९ मध्ये दिल्लीमधील जामिया परिसरात आणि १६ डिसेंबर २०१९ मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठात प्रक्षोभक भाषणं केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शर्जील इमामवर देशद्रोह आणि इतर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आता उच्च न्यायालयाने जामीन देत काहीसा दिलासा दिला आहे.

दिल्ली दंगल प्रकरणात आरोप काय आहेत?

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान शर्जिल इमामने प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. तसेच २०२० च्या दिल्ली दंगल प्रकरणात शर्जिल इमामवर कट रचल्याचा आरोप आहे.

कोण आहे शर्जिल इमाम?

शर्जिल इमाम हा मूळ बिहारच्या जहानाबादचा आहे. त्यानं मुंबईतील आयआयटी पवईमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. तसेच जेएनयूमध्ये पीएचडी करत होता. तर सीएएविरोधात दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात झालेल्या आंदोलनात त्याचा महत्वाचा सहभाग होता. दरम्यान, दिल्लीत २०२० साली झालेल्या दंगलप्रकरणात कट रचल्याचा शर्जिल इमामवर आरोप आहे.