कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. कुंकवाचा टिळा आणि भस्म लावणाऱ्या लोकांची मला भीती वाटते असं वक्तव्य बदामी या ठिकाणी बोलताना सिद्धरामय्या यांनी केलं आहे. सिद्धरामय्या हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होणार हे नक्की आहे. मात्र त्यांचं हे वक्तव्य समोर येताच सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले.

नेटकऱ्यांनी सिद्धरामय्यांना राहुल गांधी यांचे टिळा लावलेले फोटो उत्तरादाखल त्यांना पाठवले. कर्नाटकात लिंगायतांचा प्रभाव असून डोक्यावर भस्म लावणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी केलेले हे वक्तव्य हिंदूविरोधी आहे, हिंदूंचा अपमान करणारं आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. याआधी त्यांनी एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता टिळा आणि भस्म लावणाऱ्यांची मला भीती वाटते असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री हे २८ जानेवारीला एका महिलेवर चांगलेच चिडले. त्यांचा संयम सुटला आणि तिला शांत रहा असं सांगतानाच सिद्धरामय्या माईक खेचू लागले. हे करत असताना त्यांनी या महिलेच्या अंगावरची ओढणीच खेचली. सिद्धरामय्या यांचा तो व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. आता टिळा आणि भस्म लावणाऱ्यांसंदर्भात त्यांनी जे वक्तव्य केले त्यावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे.