मेघालयमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा आणि इतर ११ आमदारांना काँग्रेसला सोटचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यासोबत काँग्रेसच्या १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विंसेट यांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर ही मोठी राजकीय उलथापालथ पहायला मिळत आहे.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते मुकूल संगमा आणि प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख विंसेट यांची मेघालयच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून सर्व काही आलबेल नव्हतं. पक्षाने विंसेट यांची नियुक्ती करण्याआधी आपल्यासोबत कोणत्याही प्रकारे चर्चा केली नसल्याचंही मुकूल संगमा यांनी सांगितलं होतं.

यानंतर संगमा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र शनिवारी दोन्ही नेत्यांनी एकत्र येत आगामी निवडणुकीत हातात हात घालून काम करण्याची तयारी दर्शवली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या वतीने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमचे सदस्य काँग्रेस सदस्यांच्या संपर्कात होते. मात्र संगमा यांनी तृणमूल काँग्रेसला कोणताही शब्द दिला नव्हता. सप्टेंबरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत संगमा यांनी आपण पक्षात राहून नव्याने काम करु असं सांगितलं होतं.

“मी योग्य स्तरावर राहून पक्षाच्या चार भिंतीच्या आत नव्याने काम करेन, हेच मी करणार आहे,” असं त्यांनी सांगितलं होतं. यावेळी त्यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली होती.