माझ्या वडिलांच्या निधनांतर काही आठवड्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रजा गिलानी माझ्या घरी आले होते, असा आणखी एक गौप्यस्फोट २६/११ हल्ल्याच्या सुत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याने केला. हेडलीची शुक्रवारी टेलिकॉन्फरन्सद्वारे उलट तपासणी घेण्यात आली. यावेळी त्याने खळबळजनक खुलासे केले.

२६/११ हल्ला झाल्यानंतर पुढच्याच महिन्यात माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी माझ्या वडिलांच्या अंतयात्रेला उपस्थित होते हे साफ चूक आहे. पण माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही आठवड्यांनी ते माझ्या घरी आले होते, असा कबुली जबाब हेडलीने दिला आहे. माझे लष्करे तोयबाशी संबंध असल्याचे माझ्या वडिलांना माहित होते. मी स्वत: त्यांना या बद्दल सांगितले होते, असेही हेडलीने सांगितले आहे. याशिवाय, सौलत राणा या त्याच्या पाकिस्तानातील मित्रालाही हेडलीच्या लष्करे तोयबाशी असलेल्या संबंधांची पूर्ण माहिती होती. तसेच मुंबई हल्ल्याआधी मुंबई भेटीचीही त्याला कल्पना होती, असेही हेडलीने कबुल केले. राणाचा लष्करेशी संबंध असल्याचे हेडलीला विचारण्यात आले असता त्याने यास साफ नकार दिला.

त्यावेळी बाळासाहेबांवर हल्ला करण्याचा कोणताही विचार नव्हता- डेव्हिड हेडली

इशरत जहाँप्रकरणाबाबत विचारण्यात आले असता हेडलीने इशरत जहाँचे नाव एनआयएच्या सांगण्यावरून घेतल्याचा आरोप फेटाळून लावला. इशतरचे नाव मी एनआयएच्या सांगण्यावरून घेतलेले नाही. ते असं का करतील? त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मी इशरतला ओळखत असल्याचे सांगितले.