पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ कोटी रोजगार देऊ, युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. ते हवेत विरले का? असा प्रश्न विचारत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. गेल्या चार वर्षात रोजगाराच्या संधी वाढण्याऐवजी घटल्या आहेत. आम्ही रोजगाराच्या, नोकरीच्या संधी उलब्ध करून दिल्या असे मोदी सरकारकडून सांगण्यात येत असले तरीही त्यात तथ्य नाही असेही सिंग यांनी म्हटले आहे.

देशातले बेरोजगार युवक २ कोटी रोजगाराच्या संधी कधी निर्माण होतील याची आतुरतेने वाट बघत आहेत असा टोलाही मनमोहन सिंग यांनी लगावला. ‘मेक इन इंडिया’, स्टँड अप इंडिया यांसारख्या योजनांचा म्हणावा तसा परिणाम दिसून आलेला नाही. घाईने घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या आणि जीएसटी लागू करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक आघाडीवर देशातील उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे अशीही टीका त्यांनी केली.

मोदी सरकारच्या काळात आर्थिक आघाडीवर देश अपयशी ठरलाच. शिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न या सरकारला सोडवता आलेले नाहीत. एवढेच नाही तर शेजारी देशांशी आपले संबंध बिघडले ते याच सरकारच्या कार्यकाळात अशीही टीका त्यांनी केली. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या ‘शेड्स ऑफ ट्रूथ- ए जर्नी डिरेल्ड’ पुस्तकाचे प्रकाशन मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात त्यांनी ही टीका केली. मोदी सरकारच्या काळात देशातल्या शेतकऱ्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. कारण या सरकारचे कृषी विषयक धोरण शेतकऱ्यांना पुरक ठरू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकांच्या आधी या सरकारने जी आश्वासने दिली होती त्यापैकी कोणतेही आश्वासन या सरकारने पाळले नाही अशीही टीका त्यांनी केली.