scorecardresearch

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला माजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांचा मृत्यू

कॅथेलिक चर्चचे माजी पोप एमेरिटस बेनेडिक्ट सोळावे यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला माजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांचा मृत्यू
पोप फ्रॅन्सिस (उजवीकडे) माजी पोप एमेरिटस बेनेडिक्ट (डावीकडे) – फोटो- रॉयटर्स

कॅथेलिक चर्चचे माजी पोप एमेरिटस बेनेडिक्ट सोळावे यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं आहे. व्हॅटिकनने याला वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते २०१३ पर्यंत पोप होते. पोप बेनेडिक्ट यांच्यानंतर पोप फ्रान्सिस कॅथेलिक चर्चचं नेतृत्व केलं. पोप बेनेडिक्ट यांनी आठ वर्षांहून कमी काळ कॅथेलिक चर्चचं नेतृत्व केलं. त्यांनी २०१३ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. ६०० वर्षांच्या इतिहासात राजीनामा देणारे ते पहिले पोप होते.

त्यांच्या आधी १४१५ मध्ये १२ वे पोप ग्रेगरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. २००५ मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय यांच्या मृत्यूनंतर पोप बेनेडिक्ट कॅथलिक चर्चेचे पोप बनले होते. पोप जॉन पॉल यांचा २ एप्रिल २००५ रोजी कार्यकाळ संपणार होता, पण तत्पूर्वीच त्यांचं निधन झालं.

पोप बेनेडिक्ट यांनी आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस व्हॅटिकनमधील मेटर एक्लेसिया मठात घालवले. त्याचे उत्तराधिकारी, पोप फ्रान्सिस यांनी सांगितले की, ते अनेकदा पोप बेनेडिक्ट यांना भेटायला जात असत. व्हॅटिकनने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले की, “आम्ही अतीव दुःखाने तुम्हाला कळवत आहोत की, पोप एमेरिटस बेनेडिक्ट सोळावे यांचे आज सकाळी ९ वाजून ३४ मिनिटांनी व्हॅटिकनमधील मेटर एक्लेसिया मठात निधन झालं.”

खरं तर, २०१३ मध्ये प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव ८५ वर्षीय पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी पोपपदाचा राजीनामा दिला होता. वाढते वय आणि प्रकृतीच्या कुरबुरी यामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पदावर असताना राजीनामा देणारे बेनेडिक्ट हे ६०० वर्षांच्या पोपपदाच्या इतिहासातील पहिलेच पोप ठरले होते.

पोप बेनेडिक्ट १६ वे यांचा जन्म १९२७ मध्ये जर्मनीच्या बवेरिया या ठिकाणी झाला होता. त्यांचं नाव जोसेफ अलोंयसियस रेटझिंगर असं होतं. मात्र त्यांनी नंतर बेनेडिक्ट हे नाव निवडलं. हा लॅटीन शब्द आहे त्याचा अर्थ ‘आशीर्वाद’ असा होता. बेनेडिक्ट हे १९ एप्रिल २००५ ला २६५ वे पोप म्हणून निवडले गेले. मात्र प्रकृतीच्या कारणाने त्यांनी २०१३ मध्ये पोपपदाचा राजीनामा दिला. बेनेडिक्ट यांना जर्मन, इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि लॅटीन भाषा येत होत्या. पोप बेनेडिक्ट हे मांजर प्रेमी होते तसंच भटक्या जनावारांचीही ते काळजी घेत असत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 21:31 IST

संबंधित बातम्या