scorecardresearch

अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची ट्रम्प यांची मागणी

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची ट्रम्प यांची मागणी
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठा गैरप्रकार व फसवणूक झाल्याच्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र, या आरोपांकडे वारंवार दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांच्या या मागणीमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या ‘ट्रुथ’ या एका समाजमाध्यमावर या संदर्भात मजकूर प्रसृत केला आहे.

‘ट्विटर’चे नवे मालक व अब्जाधीश उद्योगपती इयॉन मस्क यांनी तत्कालीन अध्यक्षीय निवडणुकीचे उमेदवार जो बायडेन यांचा पुत्र हंटर बायडेन याच्या अनिर्बंध वर्तणुकीसंदर्भात पूर्वीच्या ‘ट्विटर’ व्यवस्थापनाने गाळलेल्या माहितीसंदर्भातील कंपनीचे अंतर्गत ‘ई मेल’च्या छाननीसाठी एका पत्रकाराची नियुक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही वादग्रस्त मागणी केली. 

मस्क, ट्रम्प व त्यांच्या समर्थकांनी वारंवार आरोप केले आहेत की, हंटर बायडेन यांच्याविषयी अडचणीत आणणारी माहिती व आक्षेपार्ह छायाचित्रे दडवून ठेवून ‘ट्विटर’ने डेमॉक्रॅटिक पक्षाच्या विजयाला मदत केली. हंटर बायडेन याची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे व त्याविषयीची माहिती ही ट्रम्प समर्थक प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:49 IST

संबंधित बातम्या