आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील लेहचा दौरा केला. तसंच यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला आणि त्यांचं मनोबलही वाढवलं. यानंतर काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते मनिष तिवारी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लडाखच्या दौऱ्याचा फोटो शेअर करत एक संदेश लिहिला आहे.

“तुमचं शौर्य, भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेलं समर्पण हे अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठिण काळात आणि ज्या उंच ठिकाणी भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची तुलना जगातल्या कशाचीच होऊ शकत नाही. तुमचं साहस, तुमचं शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षा मोठं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांशी संवाद साधताना म्हणाले. तसंच “तुमचे बाहू इथल्या पर्वतरांगांसारखेच बळकट आहे. तुमची इच्छाशक्तीही अटळ आहे, मी हा सगळा अनुभव घेतो आहे. त्याचंच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरुपाने उतरलं आहे” असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- पंतप्रधान किंवा लडाखी, कोणी तरी खोटं बोलतंय – राहुल गांधी

दरम्यान, मनिष तिवारी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा लडाख दौऱ्याचा एक फोटो शेअर करत त्यासोबत एक संदेशही लिहिला आहे. “जेव्हा इंदिरा गांधी यांनी लडाखचा दौरा केला होता तेव्हा त्यांनी पाकिस्तानचं दोन भागांमध्ये विभाजन केलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करतात हे पाहू” असं ट्विट त्यांनी केलं आहे. यासोबतच त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये इंदिरा गांधी यांच्या मुलाखतीतील काही भागही शेअर केला आहे.