नवी दिल्ली: पंजाबचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पंजाबमध्ये नगण्य अस्तित्व असलेल्या भाजपला शीख चेहरा मिळाला आहे. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीयमंत्री नरेंद्र तोमर, किरण रिजीजू यांनी अमरिंदर सिंग यांचे स्वागत केले.

लंडनमध्ये पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर अमरिंदर सिंग मायदेशी आले आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी ‘’पंजाब लोक काँग्रेस’’ हा त्यांचा नवा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचे जाहीर केले होते. गांधी कुटुंबाशी झालेल्या मतभेदानंतर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वत:चा राजकीय पक्ष काढला होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत ‘’पंजाब लोक काँग्रेस’’ने भाजपशी आघाडी केली होती. सोमवारी पक्षात प्रवेश करण्याआधी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.

पंजाब पाकिस्तान व चीनच्या कचाटय़ात सापडला आहे. ड्रोनचा वापर करून शस्त्रास्त्रांची, अमली पदार्थ्यांची तस्कर होत असून देशाच्या सुरक्षेला या दोन्ही देशांमुळे धोका निर्माण झाला आहे. दोन्ही शत्रू राष्ट्रांचा धोका ओळखून देशाचे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी करणे गरजेचे होते. मात्र, ती केंद्रात काँग्रेस सरकारच्या काळात झाली नाही, अशी टीका अमरिंदर सिंग यांनी केली. 

‘देश प्रथम’ हे अमरिंदर यांचे विचार भाजपशी जुळतात, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी त्यांचे कौतुक केले.

पती करेल तेच पत्नीने करावे का?’

अमरिंदर सिंग यांची पत्नी प्रिनीत कौर देखील भाजपमध्ये प्रवेश करणार का, या प्रश्नावर, ‘’पती करेल तेच पत्नीनेही केले पाहिजे का’’, असा प्रतिसवाल करत अमरिंदर सिंग यांनी उत्तर देणे टाळले. प्रिनीत कौर काँग्रेसच्या खासदार आहेत.