K Annamalai Quits BJP : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सत्ता काबीज केल्यापासून तमिळनाडूच्या राजकारणात सातत्याने घडामोडी घडताना दिसत आहेत. आता भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा चेहरा के. अन्नामलाई भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. या घडामोडींशी परिचित असलेल्या भाजपाच्या अनेक वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मंगळवारी दिल्लीत पक्षप्रमुख नितीन नवीन यांच्याकडे आपला निर्णय अधिकृतपणे सोपवण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
आज रात्रीच जाणार दिल्लीत
अन्नामलाई सोमवारी रात्री दिल्लीला पोहोचणार असून, राजीनामा देण्यासाठी ते नबीन यांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे. भाजपामधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, त्यांनी आधीच याबाबत निर्णय घेतला आहे. त्यांचा हा दिल्ली दौरा केवळ एक राजकीय भेट नसून, ज्या पक्षासोबत त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील गेली सहा वर्षे घालवली, त्या पक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. या चर्चेची माहिती असलेल्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले, “आयपीएस (IPS) पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाने त्यांना ज्या संधी, अनुभव आणि राजकीय प्रवास दिला, त्याबद्दल त्यांना नेतृत्वाचे आभार मानायचे आहेत.”
पुढचं राजकीय पाऊल काय?
गेल्या काही आठवड्यांपासून अन्नामलाई यांच्या भविष्याविषयीच्या चर्चांनी चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणच्या राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला होता. माध्यमांवर ते नवीन राजकीय संघटना स्थापन करण्याच्या तयारीत आहेत का, यावर वादविवाद होत होते आणि सोशल मीडियावर दररोज नवनवे तर्क लढवले जात होते. अफवांचा बाजार तापलेला असतानाही, अन्नामलाई यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळले होते. त्यामुळे अन्नमलाई हे खरंच राजीनामा देणार का? आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांचं पुढचं राजकीय पाऊल काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अन्नामलाई नाराज आहेत का? यावर सध्या चर्चा नसून, त्यांना नेमके काय हवे आहे? हा प्रश्न उपस्थित होतोय. ही चर्चा केवळ भाजपसमोरीलच नव्हे, तर विजय यांच्या उदयानंतर तमिळनाडूतील जवळपास प्रत्येक प्रस्थापित राजकीय शक्तीसमोर निर्माण झाली आहे. गेल्या जवळपास अर्ध्या दशकापासून अन्नामलाई यांना राज्यातील भाजपाचा चेहरा म्हणून सादर केले जात होते. त्यांनी भारतीय पोलीस सेवेचा (IPS) राजीनामा दिला, अत्यंत तरुण वयात राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच ते पक्षाचा सर्वात प्रमुख चेहरा बनले. त्यांच्या विरोधकांनीही त्यांची ऊर्जा, संघटनात्मक कौशल्य आणि राजकीय चर्चांवर पकड मिळवण्याची त्यांची क्षमता मान्य केली. तरीही, त्यांची राजकीय ओळख अनेकदा भाजपाच्या पारंपारिक चौकटीत पूर्णपणे बसत नव्हती.
इतर राज्यातील अनेक कट्टर नेत्यांप्रमाणे, अन्नामलाई यांनी आपले राजकारण कधीही उघड जातीय वक्तव्यांभोवती केंद्रित केले नाही. त्यांच्या भाषणांमध्ये अनेकदा तमिळ अस्मिता, सुशासन, भ्रष्टाचार, विकास आणि प्रशासकीय सुधारणा या मुद्द्यांचा भर असायचा. ते भाजपाची एक अशी आवृत्ती शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते, जी तमिळ भाषेच्या राजकीय संस्कृतीशी सुसंगत असेल.
नेमकं कारण काय?
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, तमिळनाडूतील भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने खाजगीत सांगितले की, दिल्लीने निवडणुकीच्या वेळी तमिळनाडूची परिस्थिती ओळखण्यात चूक केली. जर अन्नामलाई यांना अधिक स्वायत्तता आणि महत्त्व दिले गेले असते, तर कदाचित विजय हे राज्यातील राजकीय बदलाचा एकमेव चेहरा बनले नसते.
