O Panneerselvam joins DMK Tamil Nadu Politics: तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक पक्षातून पदच्यूत केलेले नेते ओ. पन्नीरसेल्वम यांनी द्रमुक पक्षात प्रवेश केला आहे. तीन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री जे. जयललिथा यांच्या जयंतीनिमित्त बोलत असताना त्यांनी म्हटले होते की, ते कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाहीत किंवा नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत. त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या उपस्थितीत द्रमुक पक्षात प्रवेश केला.
पन्नीरसेल्वम यांन काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे विधानसभेत कौतुक केले होते. तेव्हापासूनच ते द्रमुक (डीएमके) पक्षात प्रवेश करतील, असे सांगितले जात होते. पन्नीरसेल्वम यांना दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे उत्तराधिकारी मानले जात होते. जयललिता यांचे विश्वासू असल्यामुळे त्यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी याआधी मिळाली आहे.
आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पन्नीरसेल्वम यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी द्रमुख पक्षाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली.
कोण आहेत पन्नीरसेल्वम?
अण्णाद्रमुक पक्षाच्या दिवंगत नेत्या, माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे विश्वासू सहकारी म्हणून पन्नीरसेल्वम यांची ओळख होती. २००१ साली जेव्हा जयललिता यांना अधिक संपत्तीच्या प्रकरणात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून पन्नीरसेल्वम यांची निवड केली होती. २१ सप्टेंबर २००१ ते २ मार्च २००२ असे सहा महिने त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला.
सप्टेंबर २०१४ साली पुन्हा एकदा ८ महिन्यांसाठी ते मुख्यमंत्री झाले. ११ मे २०१५ साली कर्नाटक उच्च न्यायालयाने जयललिता यांना अधिक संपत्ती बाळगण्याच्या प्रकरणात मुक्त केले. तेव्हा पन्नीरसेल्वम यांनी राजीनामा दिला आणि ते मंत्रिमंडळात सामील झाले. अण्णाद्रमुकचे सरकार असताना त्यांनी विविध पदे भुषविली होती.
२०१६ साली जयललिता यांच्या निधनानंतर पन्नीरसेल्वम तिसऱ्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. यावेळी ते अडीच महिने या पदावर होते.
पक्षातील नेते व्हीके शशिकला आणि के. पलानीस्वामी यांच्याबरोबर वाद झाल्यानंतर पक्षात दोन गट पडले. ऑगस्ट २०१७ मध्ये दोन्ही गटात सामंजस्य झाल्यानंतर सर्व एकत्र आले. मात्र पक्षात पलानीस्वामी यांचे वजन वाढले.
२०२२ साली पक्षातून हकालपट्टी
पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम यांच्यातील वाद वाढत गेल्यानंतर पन्नीरसेल्वम यांना २०२२ साली पक्षातून बाहेर काढण्यात आले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपाच्या माध्यमातून अण्णाद्रमुक पक्षात परत जाण्याचा प्रयत्न केला होता.

