गृह मंत्रालयातील अधिकारी पॉर्न पाहत, माजी गृह सचिवांचा खळबळजनक खुलासा

सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त असत तेव्हा कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे भरपूर वेळ असे. ते बैठकीनंतर होणाऱ्या कामाची वाट पाहत. मग ते इंटरनेटवर पॉर्न साइट्स पाहत.

गृह मंत्रालयातील काही कर्मचारी कार्यालयातील कॉम्प्युटरवरील इंटरनेटवर पॉर्न पाहत असत, असा खळबळजनक खुलासा माजी गृह सचिव जी. के. पिल्ले यांनी केला आहे.

गृह मंत्रालयातील काही कर्मचारी कार्यालयातील कॉम्प्युटरवरील इंटरनेटवर पॉर्न पाहत असत, असा खळबळजनक खुलासा माजी गृह सचिव जी. के. पिल्ले यांनी केला आहे. गृह मंत्रालयातील नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात हा प्रकार चालायचा. कर्मचाऱ्यांच्या अशा कृत्यामुळेच कॉम्प्युटरवर मालवेअर डाऊनलोड होतो आणि संपूर्ण कॉम्प्युटर नेटवर्कची सुरक्षा धोक्यात येत असत, असे पिल्ले म्हणाले. नुकताच दहा सरकारी वेबसाइटमध्ये बिघाड झाल्याने त्या बंद झाल्या होत्या. यामध्ये गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइट्सचा देखील समावेश होता. याच पार्श्वभूमीवर पिल्ले यांचा हा महत्वपूर्ण खुलासा समोर आला आहे.

या वेबसाइट हॅक करण्यात आल्याचे प्रारंभी माध्यमांत वृत्त आले होते. नंतर सरकारने हा सायबर हल्ला नसून तांत्रिक अडचणींमुळे साइट बंद पडल्याचा खुलासा केला होता. ज्या वेबसाइटवर परिणाम झाला होता. त्यामध्ये श्रम मंत्रालय, निवडणूक आयोग आणि इपीएफओ यांचा समावेश होता. या सर्व वेबसाइटची देखभाल एनआयसीकडून होते. एनआयसीने याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत.

यूपीए दोनच्या काळात चिदंबरम गृहमंत्री असताना पिल्ले हे गृह सचिव होते. ते २०११ मध्ये निवृत्त झाले होते. मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, आठ-नऊ वर्षांपूर्वी मी जेव्हा केंद्रीय गृह सचिव होतो. तेव्हा प्रत्येक दोन महिन्याला सर्व कॉम्प्युटरमध्ये गडबड होत असत. जेव्हा सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त असत तेव्हा कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे भरपूर वेळ असत. ते बैठकीनंतर होणाऱ्या कामाची वाट पाहत असे. मग अशावेळी ते इंटरनेटवर पॉर्न साइट्स पाहत त्या डाऊनलोड करत. त्यामुळे कॉम्प्युटरमध्ये मालवेअर डाऊनलोड होत. याचा तपास केला असता ही बाब आम्हाला आढळून आली अशी माहिती त्यांनी दिली. पिल्ले त्यावेळी डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाशी निगडीत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Former union home secretary g k pillai reveals home ministry subordinates used to watch porn