दोन वर्षांपूर्वी म्हणजेच प्राची निगम जेव्हा दहावीत होती तेव्हा तिला दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळाले होते आणि तिची चर्चाही चांगलीच झाली होती. पण प्राची निगमची ही चर्चा तिच्या गुणांमुळे नाही तर तिच्या चेहऱ्यावर असलेल्या अतिरिक्त केसांमुळे झाली होती. तिला दहावीच्या परीक्षेत ६०० पैकी ५९२ गुण मिळाले होते. ते न पाहता लोकांनी तिला चेहऱ्यावरच्या अतिरिक्त केसांमुळे ट्रोल केलं होतं.
सध्या प्राची निगम हे नाव का चर्चेत आलंय?
प्राचीचं नाव सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आलं आहे कारण तिला बारावीला मिळालेले गुण. बारावीच्या परीक्षेत प्राचीने ९१.२० टक्के गुण मिळवले आहेत. आपली ओळख आपल्या गुणांनी होते, चेहऱ्यावर असलेल्या केसांनी नाही हे प्राचीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. गणितात ९९ गुण, हिंदीमध्ये ९६, रसायन शास्त्रात ९५ तर भौतिक शास्त्रात ९३ गुण मिळवत तिने पुन्हा एकदा उत्तम यश संपादित केलं आहे. आता प्राची निगम जेईई आणि आयआयटी एंट्रन्सची तयारी करते आहे असंही तिने सांगितलं. याच गुणांमुळे प्राची निगमची चर्चा पुन्हा एकदा होते आहे.
प्राचीचं नाव २०२४ मध्ये देशभरात चर्चेत का आलं होतं?
प्राची निगम हे नाव २०२४ मध्ये दहावीच्या निकालानंतर देशभरात चर्चिलं गेलं होतं. प्राचीने उत्तर प्रदेश बोर्ड हायस्कूल परीक्षेत म्हणजेच दहावीच्या परीक्षेत टॉप केलं होतं. तिच्या या यशाची चर्चा झाली पण तिच्या चेहऱ्यावर असलेल्या अतिरिक्त केसांची चर्चा जास्त झाली होती. सोशल मीडियावर प्राची निगम चर्चेत आली होती.
प्राची निगम सीतापूरची विद्यार्थिनी
प्राची निगम ही विद्यार्थिनी सीतापूर येथील सीता बाल विद्या मंदिर इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर प्राचीने माध्यमांना प्रतिक्रिया देत “मला कधीच वाटलं नव्हतं की मी टॉपर होईन. मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पण टॉपर होईन अशी अपेक्षा नव्हती. मला माझ्या मेहनतीचा अभिमान आहे.” असं म्हंटलं होतं. प्राचीने पुढे सांगितलं की, तिला अभियंता (इंजिनिअर) बनण्याची इच्छा आहे. आता ती IIT-JEE प्रवेश परीक्षा देण्याची तयारी करत आहे. तिने तिच्या यशाचे श्रेय सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि नियमित सरावाला दिले आहे. आपल्याप्रमाणे यश संपादित करण्यासाठी इतरांनाही प्रेरणा देत असतानाचा हा व्हिडीओ आपल्यावरच असा बॅक फायर करेल याचा कदाचित प्राचीने विचारही केला नसावा. कारण हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी ना तिची कहाणी ऐकली ना तिची मेहनत वाखाणली, त्यांनी फक्त पाहिले तिच्या चेहऱ्यावरचे केस आणि तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

प्राचीला करण्यात आलं होतं ट्रोल
“तू हुशार आहेस पण तुझ्या चेहऱ्यावर किती केस आहेत? तू जरा स्वतःच्या दिसण्याकडे पण लक्ष द्यायला हवं, ” असा टीकेचा सूर अनेकांच्या कॅप्शन व कमेंट्स मध्ये होता. हे कितीही दुर्दैवी असलं तरी जशी वाईट तशी चांगलीही माणसं सोशल मीडियावर असतात. या टीकांना धोबीपछाड देत अनेकांनी प्राचीची पाठराखण केली आहे. तुमच्या या अशा विचारांमुळे एका हुशार मुलीला काय वाटत असेल तिच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार केलायत का? पौगंडावस्थेत अनेकदा हार्मोन्स अनियंत्रित होतात, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) सारख्या समस्या तर तरुण मुलींमध्ये अत्यंत सामान्य आहेत, यामुळे अशाप्रकारे चेहऱ्यावर केस येऊ शकतात. प्राचीच्या बाबतही असं असू शकतं, पण अगदी हे कारण नसलं तरी तिच्या हुशारी पलीकडे जाऊन चेहरा बघणारे किती सुज्ञ आहेत? असे प्रश्न अनेकांनी या ट्रोलर्सला केले होते. काहींनी या ट्रोलर्सला चपराक लावत असंही म्हटलं होतं की, “आज हसून घ्या, उद्या ही मुलगी एखादी मोठी अधिकारी होईल आणि तुमच्यासारखे संकुचित विचाराचे लोक तिच्या पायाखालची धूळ ठरतील. तेव्हा कोण हसेल हे पाहण्यासाठी वाट बघावी लागणार नाही.” एका अन्य युजरने लिहिलं होतं की, “तुम्ही हुशार मुलींना चेहऱ्यावरून चिडवता आणि सोशल मीडियावर फक्त अश्लील हावभाव करणाऱ्यांना ‘चोरून’ फॉलो करता. तुम्ही कुठलीच बाजू घेण्यास सक्षम नाही, मुळात तुमची बाजू तितकी महत्त्वाची सुद्धा नाही.”

प्राची निगमचं ट्रोलर्सना काय होतं उत्तर?
युपी बोर्डात मी टॉप केल्यावर मी व्हायरल झाले, टॉप केलं नसतं, कदाचित एक-दोन मार्क कमी पडले असते तरी बरं झालं असतं असं आधी वाटलं होतं. पण देवाने मला जसं बनवलंय तशी मी छान आहे. ज्यांना त्यात काही फरक वाटतो त्यांच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही. लोकांनी यापूर्वीही ट्रोल केलंच होतं पण यावेळी प्रमाण जास्त होतं. मी आतापर्यंतच्या आयुष्यात अनेकदा या गोष्टी ऐकल्या आहेत. पण मला याचा फरक पडत नाही, मी फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. पण ट्रोल होत असताना असेही काही लोक होते ज्यांनी मला पाठिंबा दिला, मला त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत.”
