उत्तराखंड सरकारमधील माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी विनयभंगाचा आरोप झाल्यानंतर काही दिवसांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पाण्याच्या टाकीवर चढून बहुगुणा यांनी स्वतःवर गोळी झाडली. हल्दवानी सर्कल ऑफिसर (सीओ) भूपिंदर सिंग धोनी यांनी सांगितले की बहुगुणा यांच्या सुनेने त्यांच्यावर नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धोनी यांनी सांगितले की, त्यांच्या शेजारी सविता यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यात त्यांच्यावर तिच्या सासूसोबत फिरत असताना शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता. आत्महत्या करण्यापूर्वी बहुगुणा यांनी पोलिसांना बोलावले आणि नंतर पाण्याच्या टाकीवर चढून पिस्तुलाने गोळी झाडत आत्महत्या केली.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आत्महत्येनंतर पोलिसांनी सुनेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. “पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि संवाद साधल्यानंतर त्यांना खाली येण्यास सांगितले. पण नंतर अचानक त्यांनी बंदूक घेतली आणि छातीत गोळी झाडली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले जे अयशस्वी झाले,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आत्महत्येचे संभाव्य कारण विचारले असता, पोलीस अधिकारी म्हणाले की कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु या प्रकरणामुळे आणि आरोपांमुळे ते अस्वस्थ होते. उत्तराखंड रोडवेज कर्मचारी बहुगुणा यांना २००२ मध्ये राज्याच्या पहिल्या निवडून आलेल्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता.