एपी, द मॉइन
भिन्न काळासाठी भिन्न नेतृत्व असे आवाहन करत अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली. पेन्स हे रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आयोवा राज्यातील द मॉइन येथे आपला अधिकृत संदेश असलेला व्हिडीओ प्रसारित करून त्यांनी आपल्या ६४ व्या वाढदिवशी प्रचाराला सरुवात केली.




पेन्स उपाध्यक्ष असताना अध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता माजी अध्यक्ष-उपाध्यक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले आहेत. आपल्या या सर्वोत्तम देशाचे सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत असे वचन पेन्स यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिले.
त्यांनी प्रचार सोहळय़ाला सुरुवात करण्यापूर्वी फॉक्स न्यूज आणि ट्विटरवर हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. आपल्या पक्षाला आणि आपल्या देशाला आपल्यातील अधिक चांगल्या गोष्टींना आकर्षित करणारा नेता हवा आहे असा दावा त्यांनी केला. निष्क्रिय राहणे सोपे असते पण माझा तो स्वभाव नाही. त्यामुळे आज मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लढत असल्याचे जाहीर करतो अशी घोषणा त्यांनी केली.
पेन्स हे सामाजिकदृष्टय़ा सनातनी विचारांचे, सौम्य स्वभावाचे आणि अतिशय धार्मिक प्रवृत्ती असलेले नेते म्हणून ओळखले जातात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात लोकप्रिय विचारांना थारा देण्यास त्यांनी विरोध केला होता. आता त्यांना रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावान मतदार आणि इतर मतदार स्वीकारतात का याकडे निरीक्षकांचे लक्ष आहे.