‘वॉशिंग्टन पोस्ट’मधून ७० च्या दशकात ‘वॉटरगेट’ प्रकरणाचा पर्दाफाश करून अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे ‘पोस्ट’चे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार बेन्जामिन ब्रॅडली (९३) यांचे मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ‘वॉटरगेट’ प्रकरणास व्यापक प्रसिद्धी देत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ला जगातील अग्रेसर प्रकाशन संस्थांच्या पंक्तीत मानाचे स्थान मिळवून देण्यात ब्रॅडली यांचा सिंहाचा वाटा होता. ‘वॉटरगेट’ प्रकरणाचा गौप्यस्फोट  रिचर्ड निक्सन यांच्यासाठी अत्यंत भारी पडला आणि त्याची परिणती निक्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यात झाली. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच अशी घटना त्या वेळी घडली.
‘बेन्जामिन ब्रॅडली हे ‘खरेखुरे वृत्तपत्रकार होते’, या शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ब्रेडली यांना आदरांजली अर्पण करून त्यांचा गौरव केला. ब्रॅडली यांच्यासाठी पत्रकारिता त्यांच्या व्यवसायापेक्षा अधिक होती. ब्रेडली यांनी ‘वॉटरगेट’ प्रकरणाचा गौप्यस्फोट करून ज्या बातम्या प्रसिद्ध करणे आवश्यक होते, ते केलेच आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला विश्वाचीही चांगली ओळख झाली. प्रामाणिक, वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा आग्रह धरून त्यांनी आपला एक मापदंड निर्माण केला. त्यामुळे पत्रकारितेत प्रवेश करण्यासाठी त्यांच्यामुळेच अनेकांना प्रोत्साहन मिळाले, असेही ओबामा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही ब्रॅडली यांना आदरांजली अर्पण केली असून १९६५ मध्ये आपल्या ‘न्यूजरूम’चा ताबा घेतल्यापासूनच आपले वृत्तपत्र पारंपरिक वृत्तपत्रापलीकडे जाऊन ते महत्त्वपूर्ण कसे बनेल, याचा त्यांनी ध्यास घेतला होता, असे ‘पोस्ट’ने म्हटले आहे.
‘पोस्ट’चे ज्येष्ठ पत्रकार बॉब वूडवर्ड यांनी, ब्रॅडली हे खूप मोठे संपादक- कदाचित २० व्या शतकातीलच खूप मोठे संपादक म्हणून ओळखले जातील, या शब्दांत आदरांजली अर्पण केली. ब्रॅडली यांच्यात लोकांना प्रोत्साहित करण्याची क्षमता होती, असेही वूडवर्ड यांनी म्हटले आहे. ब्रॅडली यांना गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.