Viral Video : सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक व्हिडीओ हे अपघाताचे असतात. अपघाताच्या घटनांचे काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून थरकाप उडतो. आता अशाच एका अपघाताच्या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर एक अपघाताची घटना घडली. मात्र, या घटनेनंतर पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या एका दाम्पत्याने मोठं धैर्य आणि तत्परता दाखवत कारमध्ये अडकलेल्या पाच जणांची सुखरूप सुटका केली. कारमध्ये अडकलेल्यांची मदत करण्यासाठी या पोलीस दाम्पत्याने त्यांच्याकडे असलेल्या रायफलने गाडीच्या खिडक्या फोडल्या आणि ५ जणांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या बचावकार्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर एका भरधाव फॉर्च्युनर कारला अपघात झाला आणि ही कार उलटली. या कारमध्ये ५ जण होते. या अपघाताची घटना पाहून पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या एका दाम्पत्याने धैर्य आणि तत्परता दाखवत त्या पाच जणांची सुखरूप सुटका केली. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर घडली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
झालं असं की, कॉन्स्टेबल अमित तेवतिया हे त्यांची पत्नी अर्चना सिंगसह कन्नौजच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला एक कार अचानक उलटलेली दिसली. हे पाहून या दाम्पत्याने लगेच आपली कार थांबवली आणि उलटलेल्या कारकडे मदतीसाठी धाव घेतली. त्या गाडीमधून मदतीसाठी आवाज ऐकू येत होता. हे पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांना त्या आतमध्ये अडलेल्या लोकांना बाहेर काढता येईना.
त्यामुळे या दाम्पत्याने तत्परता दाखवत हातातील सर्व्हिस रायफलचा वापर केला आणि कारच्या खिडक्या फोडल्या, त्यानंतर काही वेळाने कारमधील पाचही जणांना एकेक करून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. अपघातात जखमी झालेल्या या पाचही जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेतील बचावकार्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी त्या कॉन्स्टेबल दाम्पत्याने दाखवलेले धैर्य, तत्परता आणि प्रसंगावधानाचं कौतुक केलं आहे.
