गलवानच्या संघर्षात चीनला मोठा फटका, रशियन वृत्तसंस्थेचा मोठा दावा

जून २०२०मध्ये गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता.

संग्रहित छायाचित्र

भारत आणि चीनमधील सैन्य माघारीच्या प्रक्रियेची बातमी देताना रशियन वृत्तसंस्था ‘तास’ने एक मोठा दावा केला आहे. जून २०२०मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात चीनचे ४५ सैनिक ठार झाले, तर भारताचे २० जवान शहीद झाले असे तासने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीन दोघांनी सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु केली आहे.

काल चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सर्वप्रथम सैन्य माघारी सुरु झाल्याचे जाहीर केले होते. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत या संबंधी माहिती दिली. गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले किती सैनिक ठार झाले, ते चीनने अद्यापही जाहीर केलेले नाही.

आणखी वाचा- लडाख: भारत-चीन सैन्य माघारी बाबत राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली महत्त्वाची माहिती

अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्यानेही काही माध्यमांनी गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचे म्हटले होते. गलवानमधील या घटनेच्या सात ते आठ महिन्यानंतर आता दोन्ही देश तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत.

संसदेत राजनाथ सिंह काय म्हणाले…
भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, आज संसदेत सांगितले. लडाखमध्ये चीन बरोबर सुरु असलेल्या सीमावादाच्या विषयावर ते बोलत होते. पँगाँग टीसओ सरोवराच्या भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली.
पँगाँग सरोवराच्या भागातील सैन्य तैनाती मुख्य कळीचा मुद्दा आहे. चीनने इथे फिंगर फोरपर्यंत सैन्य तैनात केल्याने वाद चिघळत गेला. “चीन बरोबर सतत सुरु असलेल्या चर्चेतून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनाऱ्यावरुन सैन्य माघारीवर सहमती झाली आहे. टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Foruty five chinese soldiers died in galwan reports russian news agency tass dmp

ताज्या बातम्या