RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आपल्या सगळ्यांनाच थोड्याफार प्रमाणात माहिती आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर संघाचा दबदबा काही प्रमाणात वाढल्याच्या चर्चाही रंगताना दिसतात. पण या संघटनेची स्थापना नेमकी कोणत्या उद्देशाने झाली. ती कधी आणि कोणी केली याचे नेमके तपशील आपल्याला माहित असतातच असे नाही. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन ९३ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संघाशी निगडित गोष्टींचा घेतलेला आढावा…

– उजव्या विचारसरणीचे म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी करण्यात आली.

– डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये संघाची स्थापना केली. देशसेवेसाठी तयार करण्यात आलेली संघटना म्हणून संघाची ओळख सांगितली जाते.

– हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूना एकत्र करण्याचे काम करणे हे संघटनेचे स्थापनेच्या वेळचे मुख्य उद्दीष्ट होते.

– संघाच्या देशातच नाही तर जगभरात शाखा भरतात. याठिकाणी लहान मुलांचे विविध खेळ घेतले जातात. तसेच त्यांना मूल्यशिक्षण दिले जाते.

भारतीय जनता पार्टी हा देशात आणि राज्यातही सत्तेत असणारा देशातील एक प्रमुख पक्ष संघाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.

– संघावर स्थापना झाल्यापासून तीन वेळा बंदी घालण्यात आली होती. १९४८ मध्ये गांधींची हत्या झाल्यानंतर, १९७५-७७ या आणीबाणीच्या काळात आणि बाबरी मशीद प्रकरणानंतर १९९२ मध्ये ही बंदी घातली गेली.

– संघात येणाऱ्या स्वयंसेवकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यासाठी कालांतराने संघाच्या प्रशिक्षण वर्गाची योजना करण्यात आली. हे वर्ग विविध स्तरावर आजही घेतले जातात.

– या शिबिराला ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प म्हटले जायचे. मात्र संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांनी या शिबिराचे नामकरण संघ शिक्षा वर्ग असे केले.

– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास, भूमिका, कामाची पद्धती यांबाबत संघाच्या वर्गात माहिती दिली जाते. त्याचबरोबर विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर वैचारिक बैठक पक्की होण्यासाठी बौद्धिक वर्गांचेही आयोजन केले जाते.

– माधव गोळवलकर गुरुजी हे संघाचे दुसरे प्रभावी सरसंघचालक होते. त्यांनी सर्वाधिक म्हणजे ३५ वर्षे सरसंघचालक म्हणून काम पाहिले.