उत्तर प्रदेशमधील बागपत येथील चंदीनगर भागातील सिंगुलाई तागा गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका गाडीमध्ये खेळणाऱ्या पाच मुलांपैकी चार मुलांचा गाडीत गुदमरुन मृत्यू झालाय. गाडी ऑटो लॉक झाल्याने ही मुलं गाडीत अडकली आणि त्यातच त्यांचा दुर्देवी अंत झाला. अनिल त्यागी यांच्या चार चाकी गाडीमध्ये पाच मुलं खेळत होती. घरासमोरच उभ्या असणाऱ्या या गाडीमध्ये मुलं खेळत असतानाच अचानक गाडी लॉ८क झाली आणि मुलं गाडीत अडकली.

गाडीमध्ये अडकलेल्या मुलांमध्ये नियती (८), वंदना (४), अक्षय (४), कृष्णा (७) आणि श्रीविनेश (८) या पाच जणांचा समावेश होता. श्रीविनेश वगळता इतर चौघांचाही गाडीमध्येच गुदमरुन मृत्यू झाला. सर्कल ऑफिसर मंगल सिंह रावत यांनी प्राथमिक तपासामध्ये मुलांचा मृत्यू गुदमरुन झाल्याचं दिसत असल्याचं म्हटलं आहे. मात्र शेजाऱ्यांनी या प्रकरणासाठी गाडीचा मालक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याला शिक्षा केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

नियती, वंदना, अक्षय आणि कृष्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जातेय.