scorecardresearch

दहशतवाद्यांना मदतप्रकरणी ‘हिज्बुल’ नेता सलाउद्दीनच्या मुलासह चार कर्मचारी बडतर्फ

अधिकाऱ्यांनी सांगितले, की या चारही कर्मचाऱ्यांना भारतविरोधी काम करणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहिल्याबद्दल व दुष्प्रचार केल्याबद्दल बडतर्फ करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांना मदतप्रकरणी ‘हिज्बुल’ नेता सलाउद्दीनच्या मुलासह चार कर्मचारी बडतर्फ
(संग्रहित छायाचित्र)

पीटीआय, श्रीनगर : बंदी घातलेली दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनचा मुलगा, तसेच दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याचा आरोप असलेला बिट्टा कराटे याच्या पत्नीसह चार कर्मचाऱ्यांना जम्मू-काश्मीर प्रशासनाने शुक्रवारी सरकारी सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अल्पसंख्याकांवरील जीवघेण्या हल्ल्याच्या आरोपाखाली बिट्टा सध्या कारागृहात आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की या चारही कर्मचाऱ्यांना भारतविरोधी काम करणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहिल्याबद्दल व दुष्प्रचार केल्याबद्दल बडतर्फ करण्यात आले आहे. राज्यघटनेतील ३११ व्या अनुच्छेदानुसार या चारही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या अनुच्छेदानुसार सरकारला आपल्या कर्मचाऱ्याला कोणत्याही चौकशीविना बडतर्फ करण्याचे अधिकार आहेत. यापैकी सय्यद अब्दुल मुईद हा उद्योग आणि वाणिज्य विभागात प्राद्योगिकी प्रबंधक होता. तो पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनचा नेता सय्यद सलाउद्दीनचा मुलगा आहे. मुईद हा सलाउद्दीनचा सरकारी नोकरीतून बडतर्फ करण्यात आलेला तिसरा मुलगा आहे. गेल्या वर्षी सय्यद अहमद शकील आणि शाहिद युसूफ यांनाही बडतर्फ करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले, की पम्पोरच्या सेमपोरा येथील ‘जम्मू-काश्मीर एन्टरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट’वर तीन हल्ले झाले होते. त्यात मुईदचा हात असल्याचे सिद्ध झाले. फारूक अहमद डार ऊर्फ बिट्टा कराटे  न्यायालयीन कोठडीत आहे.

त्याची पत्नी अस्सबाह-उल-अर्जमंद खान ही जम्मू-काश्मीरच्या प्रशासकीय सेवेतील २०११ ची अधिकारी आहे. ती पारपत्रासंबंधी चुकीची माहिती दिल्याप्रकरणी दोषी ठरली आहे. तिचा पाकिस्तानी गुप्तचर विभाग आयएसआयसाठी काम करणाऱ्या परदेशी व्यक्तींशी संपर्क होता. तसेच खान हिचा जम्मू-काश्मीरमध्ये भारतविरोधी कारवायांसाठी आर्थिक निधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कथित रीत्या सहभाग होता. बिट्टा कराटे दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याप्रकरणी २०१७ पासून तिहार कारागृहात अटकेत आहे. १९९० च्या प्रारंभी अल्पसंख्य समुदायावर हल्ला करून हत्या केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. काश्मीर विद्यापीठाचे संगणकशास्त्राचे पदव्युत्तर पदवी विभागातील प्राध्यापक आणि वैज्ञानिक डॉ. मुहीत अहमद भट यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. काश्मीर फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांच्या विचारांचा विद्यापीठात प्रचार करण्यात त्यांचा सहभाग सिद्ध झाला आहे. तसेच काश्मीर विद्यापीठाचे वरिष्ठ सहायक प्राध्यापक माजिद हुसेन कादरी यांचे कथित रीत्या लष्कर ए तय्यबासहित इतर दहशतवादी संघटनांशी दीर्घ काळ संबंध असल्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्यांनाही बडतर्फ करण्यात आले. यापूर्वी माजिदविरुद्ध जनसुरक्षा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत सुमारे ४० कर्मचाऱ्यांना अशा विविध आरोपांमुळे बडतर्फ करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four employees son hizbul leader salahuddin dismissed connection helping terrorists ysh

ताज्या बातम्या