एनडीएफबी (एस) या बंडखोर गटाने केलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ नागाव जिल्हय़ात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले.
बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्ट्स (बीटीएडी) भागातील हिंसाचाराविरोधात  १२ तासांचा आसाम बंद पुकारण्यात आला होता.दरम्यान आसाममधील हिंसाचाराच्या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत न्यायालयीन चौकशी करण्यात येईल असे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी सांगितले. हिंसाचारग्रस्त जिल्हय़ांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले, की मुस्लिम विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांवर दोबोका येथे पोलिसांनी गोळीबार केला. रास्ता रोको मागे घेण्यास सांगितल्यानंतर निदर्शकांनी दगडफेक करून पोलिसांवर हल्ला केला होता. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 दुसऱ्या एका घटनेत सोनारीबिल येथे बंदच्या समर्थकांनी हल्ले करून कोळियाबारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची व परिक्षेत्र अधिकाऱ्याची वाहने पेटवली. आसाममध्ये एनडीएफबी या चर्चाविरोधी संघटनेने बाकसा व कोक्राझार जिल्हय़ात केलेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ३४ झाली आहे. शुक्रवारपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.
लष्कराचे ध्वजसंचलन
 बकसा येथे सकाळी दहापासून तर कोक्राझार व चिरांग येथे अनुक्रमे सकाळी १० पासून सहा तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी लष्कराने हिंसाचारग्रस्त भागात ध्वजसंचलन केले.
सुरक्षा दलांची गस्त या भागात सुरू असून हिंसाचार रोखण्याचे प्रयत्न आहेत असे सूत्रांनी सांगितले. पोलिस महानिरीक्षक एल. आर. बिश्नोई यांनी असा दावा केला, की बकसाल या उदलगुरी जिल्हय़ातील खेडय़ात मोठा हल्ला टाळण्यात आला त्या वेळी चकमकीत एनडीएफबी (एस)चे दोन बंडखोर ठार झाले. जे घर सोडून पळाले आहेत त्या भयभीत झालेल्या लोकांना सरकारी मदत छावण्यांत आश्रय देण्यात आला आहे.