मच्छरांसाठी लावलेल्या कॉईलमुळे घराला आग लागून चार जणांचा मृत्यू

घरात मच्छरांसाठी लावलेल्या कॉईलमुळे आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

delhii
(फोटो – एएनआय)

दिल्लीत मंगळवारी पहाटे जुनी सीमापुरी भागात एका घराला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घरात मच्छरांसाठी लावलेल्या कॉईलमुळे आग लागल्याचं समजतंय. अग्निशमन दलाला पहाटे चार वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. मात्र अग्निशमन दलाचे जवान घराच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले असता एका खोलीत कुटुंबातील चारही सदस्य मृतावस्थेत आढळले आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही लोक घराच्या तिसऱ्या मजल्यावरील एका छोट्या खोलीत मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये ५८ वर्षीय होरीलाल, त्यांची ५५ वर्षीय पत्नी रीना, त्यांचा २४ वर्षीय मुलगा आशू आणि १८ वर्षीय मुलगी रोहिणी यांचा समावेश आहे. होरीलाल शास्त्री हे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी होते आणि मार्च २०२२ मध्ये ते निवृत्त होणार होते. तर त्यांची पत्नी एमसीडीमध्ये सफाई कामगार होती. आशू बेरोजगार होता तर रोहिणी सीमापुरी येथील सरकारी शाळेत बाराव्या वर्गात शिकत होती.

अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वांचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. मच्छरांसाठी लावलेल्या कॉईलमुळे आग लागली आणि त्यामुळे झालेल्या धुरामुळे सर्वाचा गुदमरून मृत्यू झाला, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर, चारही जणांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. रात्री सर्व जण झोपलेले असल्यामुळे घरात आग लागल्याचं कुणालाच कळू शकलं नाही आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली हे या घटनेच्या सखोल चौकशीनंतरच कळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Four people died after house caught fire due to mosquito coil in delhi hrc

ताज्या बातम्या