दिल्लीतील सब्जी मंडी भागात एक चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अग्निशमन दलाला ११ वाजून ५० मिनिट वाजले असताना कॉल आला. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. जवानांनी स्थानिकांच्या मदतीने एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं असून त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. इमारत कशी कोसळली? याबाबतचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. ही इमारत ७० वर्षे जुनी होती. ही इमारत धोकादायक असल्याचं महापालिकेनं घोषित केलं होतं. इमारतीत असलेल्या मिठाईच्या दुकानात ४-५ मजूर ड्रिलिंगचं काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे हे मजूर या इमारतीखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर एक कुटुंब या इमारतीखालून जात असताना या इमारतीचा भाग कोसळल्याची प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.

“सब्जी मंडी परिसरातील इमारत कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.”, असं ट्वीट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

रविवारी दिल्लीतील नरेला भागात एक जुनी इमारत कोसळली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. ही इमारत धोकादायक असल्याचं एनडीएमसीने घोषित केली होती. दुसरीकडे दिल्लीत गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.