पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आज तब्बल चौदा वर्षांच्या खंडानंतर इतर सदस्यांसमवेत पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत सदस्यत्वाची शपथ घेतली. गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात पाकिस्तानात प्रथमच लोकशाही मार्गाने सत्तांतर झाले आहे. नवाझ शरीफ यांना नॅशनल असेंब्लीच्या मावळत्या सभापती फेहमिदा मिर्झा यांनी शपथ दिली. अत्यंत कडक सुरक्षेत आज नॅशनल असेंब्लीचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ गटाचे प्रमुख नवाझ शरीफ हे लाहोर येथून काही सहकाऱ्यांसमवेत रावळपिंडी येथे आले. नंतर ते मोटारीने इस्लामाबादला आले, तेथे ते नॅशनल असेंब्ली अधिवेशनास उपस्थित होते. यावेळी लष्कराची हेलिकॉप्टर्स हवाई टेहळणी करीत होती. त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते.
कुराणातील काही कडव्यांचे पठण केल्यानंतर सभापतींनी त्यांना शपथ दिली. मिर्झा यांनी असे सांगितले की, ३ जून रोजी नवीन सभापती व उपसभापती यांची निवड केली जाईल. त्यानंतर पाच जूनला शरीफ यांची सभागृहनेतेपदी निवड होईल.
शरीफ यांनी रावळपिंडी विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितले की, ११ मे रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततामय मार्गाने सत्तांतर झाले याबाबत आपण समाधानी आहोत. त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठकही घेतली.