IAS Neha Marvya Transfer controversy: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची आजवर २५ वेळा बदली झाली आहे. त्यांची काम करण्याची धडाकेबाज पद्धत आणि कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच होणारी बदली राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच आता मध्य प्रदेशमधील एक महिला आयएएस अधिकारी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मध्य प्रदेशच्या आयएएस अधिकारी नेहा मारव्या सिंह यांची वर्षभरात चौथ्यांदा बदली करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा असोसिएशनला पत्र लिहून आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला, असे वृत्त हिंदुस्तान टाइम्ससह इतर काही माध्यमांनी दिले आहे. मात्र नेहा मारव्या यांनी मात्र पत्राबाबत जाहीर वाच्यता किंवा कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.
एखादा पदभार मिळाल्यानंतर दोन ते तीन महिन्यातच बदली केली जात आहे. आपल्या पत्रात याबद्दल त्या म्हणाल्या, “माझे काम समजून घेईपर्यंतच मला बाजूला केले जात आहे.” नेहा मारव्या सिंह या २०११ सालातील बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
नेहा मारव्या यांनी दोन महिन्यांपूर्वीच आदिवासी क्षेत्र विकास प्रकल्पाच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांची आता बदली करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. त्याच्या काही दिवसांनंतर ही बदली करण्यात आली आहे.
५० दिवस होण्याआधीच बदली
नेहा मारव्या सिंह यांनी आयएएस असोसिएशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आपल्या तक्रारीचे पत्र शेअर केले. नव्या ठिकाणी रुजू होऊन ५० दिवस होण्याआधीच आपली बदली करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, मी नेहमीच सरकारी आदेश आदराने स्वीकारत आले आहे, मात्र यावेळी मला फार निराश वाटत आहे. माझ्या हाताखालील कर्मचाऱ्यांनी माझ्या डेस्कवर हात आपटून माझी बदली करण्याची धमकी दिली. फाईल्स दाबून ठेवल्याबद्दल मी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मलाच बाजूला करण्यात आले आहे.
मारव्या यांनी बदलीवर बोलताना म्हटले की, एक आयएएस अधिकारी इतका असुरक्षित आहे का? की त्याच्याखाली काम करणाऱ्या लोकांनी त्याच्या बदलीची धमकी द्यावी. एखाद्या अधिकाऱ्याला काम नीट समजून घेण्यासाठी किमान महिन्याभराचा वेळ लागतो. मी महिन्याभरात काय काम करू शकते. तरीही या बदलीमुळे मला अपमानित करण्यात आले आहे.
“आपल्याला प्रत्येकवेळी एखाद्या पदावर काम करण्यासाठी कमी कालावधी मिळत असून यातून माझे खच्चीकरण होत आहे. कधीतरी बदल होईल, याचा विचार करून मी अनेक वर्षांपासून संयम बाळगला होता. पण आता तर हाताखालचे लोकही धमकी देऊ लागले आहेत. प्रत्येकवेळी कट कारस्थान रचणारे जिंकतात आणि माझी हार होते. आज माझ्याबाबत हे होत आहे, उद्या कुणा दुसऱ्या अधिकाऱ्याला लक्ष्य केले जाईल”, अशी नाराजी नेहा मारव्या यांनी पत्रातून व्यक्त केली.
१५ वर्षांत ११ वेळा बदली
जानेवारी २०२५ मध्ये नेहा मारव्या यांना दिंडोरी जिल्हाधिकारी पदावरून अवघ्या आठ महिन्यातच हटविण्यात आले. हे पद त्यांना १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळाले होते. माध्यमातील बातम्यांनुसार, नेहा मारव्या यांची १५ वर्षांच्या कारकिर्दीत आजवर ११ वेळा बदली करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढेंच्या २१ वर्षांत २५ बदल्या
तुकाराम मुंढे यांची तीन महिन्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्याआधी ते दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत होते. तडफदार व ‘मिस्टर क्लीन’ अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या तुकाराम मुंढे यांची बदली नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. त्यांनी आतापर्यंत भूषविलेली पदे खालीलप्रमाणे:
१) ऑगस्ट २००५ – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
२) सप्टेंबर २००७ – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
३) जानेवारी २००८ – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर<br>४) मार्च २००९ – आयुक्त, आदिवासी विभाग
५) जुलै २००९ – सीईओ, वाशिम
६) जून २०१० – सीईओ, कल्याण
७) जून २०११ – जिल्हाधिकारी, जालना
८) सप्टेंबर २०१२ – विक्रीकर सहआयुक्त मुंबई
९) नोव्हेंबर २०१४ – सोलापूर जिल्हाधिकारी
१०) मे २०१६ – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
११) मार्च २०१७ – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे<br>१२) फेब्रुवारी २०१८ – आयुक्त, नाशिक महापालिका
१३) नोव्हेंबर २०१८ – सहसचिव, नियोजन
१४) डिसेंबर २०१८ – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
१५) जानेवारी २०२० – आयुक्त, नागपूर महापालिका
१६) ऑगस्ट २०२० – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
१७) जानेवारी २०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
१८) सप्टेंबर २०२२ – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
१९) जुलै २०२३ – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
२०) जून २०२४ – विकास आयुक्त (असंघटित कामगार)
२१) ऑगस्ट २०२५ – सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, मंत्रालय
२२) मे २०२६ – आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
