France Iran Strait of Hormuz news reveals how diplomatic shifts are impacting global shipping routes during the ongoing conflict : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या इराणविरोधातील युद्धाबाबतच्या भूमिकेवर टीका केली होती. यानंतर एक मोठा बदल घडला असून, फ्रान्सच्या मालकीच्या एक कंटेनर जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडली आहे. त्यामुळे आता इराण फ्रान्सला आपला शत्रू देश मानत नसल्याचे संकेत मिळत आहेत.

मरीनट्रॅफिकच्या ट्रॅकिंग डेटानुसार फ्रेंच शिपिंग ग्रूप ‘सीएमए सीजीएम’च्या मालकीचे आणि माल्टाचा ध्वज असलेल्या क्रिबी (Kribi) या जहाजाने २ एप्रिल रोजी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर या मार्गावरून प्रवास करणारे हे पहिलेच फ्रान्सच्या मालकीचे जहाज आहे.

फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांनी युद्धाच्या मुद्द्यावर जाहीरपणे ट्रम्प यांच्यावर टीका केल्यानंतर आणि होर्मुझची सामुद्रधुनी लष्करी बळाचा वापर करून पुन्हा खुली करण्यास नकार दिल्यानंतर लगेचच फ्रान्सच्या जहाजाने सामुद्रधुनी ओलांडली आहे.

दक्षिण कोरियाच्या दोऱ्यावेळी बोलताना मॅक्रॉन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. लष्कराचा वापर करून होर्मुझच्या सामुद्रधुनीचा ताबा घेण्याची अमेरिकेचा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याचे मॅक्रॉन म्हणाले होते. सामुद्रधुनी खुली करण्यासाठी लष्करी बळाचा वापर केल्यास सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इतरांना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि त्यांच्या क्षेपणास्त्रांपासून धोका होऊ शकतो, याकडे मॅक्रॉन यांनी लक्ष वेधले

ते म्हणाले की, “हे अवास्तव आहे कारण यासाठी खूप वेळ लागेल आणि यामुळे सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या सर्वांना किनारपट्टीवरील धोक्यांचा सामना करावा लागेल.” तसेच तोडगा काढण्यासाठी युद्धविराम आणि इराणबरोबर वाटाघाटी पुन्हा सुरू करणे याची आवश्यकता असल्याचेही मॅक्रॉन म्हणाले.

मॅक्रॉन यांनी यावेळी ट्रम्प यांच्या संघर्षाबाबत सतत बदलणाऱ्या भूमिकेवरही टीका केली. “तुम्ही गंभीर व्हायला हवे. जेव्हा तुम्हाला गंभीर व्हायचे असते, तेव्हा तुम्ही आदल्या दिवशी जे काही बोललात त्याच्या उलट आज बोलू शकत नाहीत. आणि कदाचित तुम्ही दररोज बोलूच नये,” असे मॅक्रॉन म्हणाले.

दरम्यान फ्रान्सच्या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे कशी ओलांडली याबद्दल अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. मात्र एलएलईजी शिपिंग डेचानुसार, जहाजाने गुरूवारी इराणची समुद्री हद्द ओलांडण्यापूर्वीच त्यांचे डेस्टिनेशन ‘ओनर फ्रान्स’ असे बदलले, ज्यामुळे इराणी अधिकाऱ्यांना जहाजाच्या मालकाच्या राष्ट्रीयत्वाबाबत संकेत मिळाले.

हे जहाज पहिल्यांदा रिपब्लिक ऑफ काँगो मधील पॉइंट-नॉएर (Point Noire) कडे जात होते. मात्र नंतर ट्रॅकिंग डेटावरून हे जहाज ओमानच्या किनाऱ्याच्या दिशेने दक्षिणेकडे जात असल्याचे दिसून आले. दरम्यान सीएमए सीजीएम तसेच फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घडामोडींवरअद्याप भाष्य केलेले नाही.

युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्यापूर्वी या सागरी मार्गावरून जागतिक तेल आणि लिक्विफाइड नॅचरल गॅसपुरवठ्यापैकी सुमारे पाचवा वाहून नेला जात होता. मात्रमध्यपूर्वेतील संघर्षामुळे या जलमार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.

अमेरिकेने इराणविरोधात युद्ध सुरू केल्यापासीन, ट्रम्प यांनी त्यांची रणनीती, मित्रराष्ट्र आणि संघर्ष याबाबत वेगवेगळी विधाने केली आहेत, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून त्यांच्यावर टीका होत आहे.