Rahul Gandhi PA Fraud Investigation: नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीनं केरळमध्ये विजय मिळवत सत्ता मिळवली. मात्र, इतर चारही राज्यांमध्ये काँग्रेसची सुमार कामगिरी राहिली. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या भवितव्याबाबत सत्ताधारी भाजपाकडून खोचक टीका करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे पक्षात मोठं पद किंवा आगामी निवडणुकांमध्ये तिकीट मिळवून देण्याचं आमिष दाखवून देशाच्या विविध भागातल्या काँग्रेस नेत्यांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी या भामट्याला अटक केली असून आपण राहुल गांधींचे स्वीय सहाय्यक असल्याचा दावा हा भामटा करत असे.

नेत्यांना लुटण्यासाठी राहुल गांधींच्या नावाचा वापर

डेहराडून पोलिसांनी गौरव कुमार नावाच्या ४२ वर्षीय व्यक्तीला अटक केली असून तो मूळचा अमृतसरचा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. आपण राहुल गांधींचे स्वीय सहाय्यक असून पक्षात मोठं पद किंवा निवडणूक तिकीट मिळवून देऊ शकतो, असं आश्वासन तो पीडित नेत्यांना द्यायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. गौरव कुमारनं देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या काँग्रेस नेत्यांना पदांचं आमिष दाखवून लाखोंची मागणी केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. रविवारी उत्तराखंड काँग्रेसमधील नेत्या भावना पांडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर गौरव कुमारचा भांडाफोड झाला.

भावना पांडे यांची कशी झाली फसवणूक?

भावना पांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्यांच्याकडे पक्षात वरचं पद मिळवून देण्याच्या मोबदल्यात २५ लाख रुपयांची मागणी केली होती. गौरव कुमारनं त्यांना फोन केला तेव्हा आपलं नाव किनिष्क सिंह असल्याचं सांगितलं. आपण राहुल गांधींचे स्वीय सचिव असल्याचंही त्यांनी सांगितलं. उत्तराखंड काँग्रेसमध्ये तुम्हाला वरचं पद मिळवून देतो, असं सांगत त्यासाठी २५ लाख रुपये लागतील अशी मागणी केली.

“माझा या सगळ्यावर विश्वास बसावा म्हणून त्यानं मोबाईल फोन स्पीकर मोडवर ठेवला आणि पलीकडून चार व्यक्तींच्या बोलण्याचा आवाज ऐकवला. या व्यक्ती म्हणजे उत्तराखंड काँग्रेसमधील वरीष्ठ नेते हरीष रावत, हरक सिंह, यशपाल आर्या आणि गणेश गोदियाल हे असल्याचा दावा केला. त्यांनी मला सांगितलं की डेहराडूनच्या एका आलिशान हॉटेलमध्ये सध्या १२ आमदार वास्तव्य करत असून गेल्या १० दिवसांपासून आम्ही त्यांना तिथे आवश्यक त्या सर्व गोष्टी पुरवत आहोत. त्यांचा तिथे राहण्याचा खर्च २२ लाख ५० हजार इतका असल्याचंही त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली”, अशी माहिती भावना पांडे यांनी दिली.

पैसे मिळाले आणि भामटा पसार!

१३ एप्रिल रोजी आरोपी गौरव कुमारनं जखन परिसरातील माझ्या घरी त्याच्या एका सहकाऱ्याला पाठवलं. तिथे रोख स्वरूपात २५ लाख रुपये माझ्याकडून घेतले गेले, असं भावना पांडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पैसे मिळाल्यानंतर आरोपीनं भावना पांडेंचे फोन उचलणं बंद केलं आणि घेतलेले पैसेदेखील परत केले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे. या टोळीनं अशाच प्रकारे गोवा, मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि इतर राज्यामध्येदेखील काँग्रेस नेत्यांना फसवण्याचे प्रकार केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, जेणेकरून इतर नेत्यांची फसवणूक होणार नाही, अशी मागणी भावना पांडे यांनी केली.

अनेक वरीष्ठांच्या संपर्कात होता गौरव कुमार

दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फूटेज आणि आपल्या हेरांकरवी माहिती गोळा केली. त्यातून धक्कादायक सत्य उघड झालं. आरोपी गौरव कुमार हा उत्तराखंडमधील अनेक वरीष्ठ नेत्यांच्या संपर्कात होता. त्याला अटक केली, तेव्हा निवडणूक तिकीट मिळवून देण्याच्या मोबदल्यात अशाच प्रकारे मागितलेली रोख रक्कम घेण्यासाठी आरोपी जखन परिसरातील पॅसिफिक मॉलजवळ निघाला होता, असंही पोलिसांनी सांगितलं.

किनिष्क सिंह खरंच राहुल गांधींचे स्वीय सचिव?

पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर गौरव कुमारनं सगळंकाही कबूल करत त्याची मोडस ऑपरेंडी सांगितली. ज्या नेत्यांकडून पैसे मागायचे आहेत, त्यांची माहिती गोळा करण्यासाठी ही मंडळी गुगलचा वापर करत. त्यावरून संबंधित नेत्यांची, त्यांच्या नातेवाईकांची आणि जवळच्या व्यक्तींची माहिती गोळा केली जात असे. त्यानंतर त्या नेत्याला गाठून त्याला घोळात घेऊन पैशांची मागणी केली जात असे. पैसे मिळताच ही मंडळी नेत्यांना कोणतंही उत्तर न देता पसार होत असत.

गौरव कुमारनं दिलेल्या कबुलीजबाबानुसार, २००३ ते २०१५ या काळात किनिष्क सिंह नामक व्यक्ती राहुल गांधींची स्वीय सचिव होती, अशी माहिती आरोपीला मिळाली होती. त्यानंतर त्यानं किनिष्क सिंहच्या नावे ट्रू कॉलर आयडी तयार केला. पक्षातील अनेक वरीष्ठ नेत्यांची देखील माहिती त्यानं गोळा केली होती. गेल्या ८ ते १० वर्षांपासून तो हे सगळे प्रकार करत होता. २०१७ साली जयपूरमध्ये त्यानं दोन काँग्रेसच्या नेत्यांकडून अनुक्रमे १ कोटी ९० लाख आणि १२ लाख रुपये निवडणूक तिकीट मिळवून देण्याच्या आमिषाखाली घेतले होते. २०२५ साली पाटण्यात त्यानं अशाच प्रकारे पक्षात वरचं पद मिळवून देतो असं सांगून एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून ३ लाख रुपये घेतले होत!