चीनने कोणतीही आगळीक केल्यास जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे स्वातंत्र्य ३५०० किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तैनात केलेल्या जवानांना देण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी रविवारी दिली.

गलवान खोऱ्यातील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीत चीनला सडेतोड उत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीला संरक्षण दलांचे प्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग आणि हवाईदलप्रमुख आरकेएस भदौरिया उपस्थित होते.

या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना चीनच्या सीमेलगतच्या, हवाईहद्दीलगतच्या आणि मोक्याच्या सागरी मार्गावरील चिनी लष्कराच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.  दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत रशियाच्या जर्मनीवरील विजयास ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने मॉस्कोत होणाऱ्या भव्य लष्करी कवायतींना उपस्थित राहण्यासाठी रशियाला रवाना होण्यापूर्वी संरक्षणमंत्र्यांनी लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला.

सीमेचे रक्षण करण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली असून सशस्त्र दलांना संपूर्ण सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनने कोणतीही  आगळीक केल्यास कशाचाही विचार न करता जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सशस्त्र दलांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बंदुका न चालवण्याच्या दोन्ही देशांतील १९९६ आणि २००५च्या करारांस भारतीय जवान बांधील राहणार नाहीत, असे गलवान खोऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट करण्यात आल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.  यापुढे आमचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असेल. सशस्त्र तुकडय़ांच्या कमांडरना परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे, असे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

गलवान खोऱ्यातील १५ जूनच्या धुमश्चक्रीत चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवानांना वीरमरण आल्यानंतर भारताने लढाऊ जेट विमाने सज्ज ठेवली असून हजारो अतिरिक्त जवानांची कुमकही सीमेनजिकच्या भागात तैनात केली आहे.

गलवान खोऱ्यातील हिंसाचारामुळे सुमारे ४५ वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, भारताला शांतता हवी आहे, परंतु कुणी चिथावणी दिल्यास जशास तसे उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत, असा इशारा चीनला दिला आहे.

भारताची सज्जता

भारतीय हवाई दलाने यापूर्वीच सुखोई ३० एमकेआय, जग्वार मिराज २००० आणि अपाची हेलिकॉप्टर्स लेह आणि श्रीनगरसह महत्त्वाच्या हवाईतळांवर सज्ज ठेवली आहेत. सीमेलगतच्या चीनच्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी हवाई दल सूसज्ज असून त्याचाच एक भाग म्हणून लडाखमध्ये हवाई गस्तही घालण्यात आल्याचे हवाईदलप्रमुख भदौरिया यांनी शनिवारी म्हटले होते. लढाऊ जेट विमानेही जवळच्या हवाई तळांवर शस्त्रसज्ज ठेवण्यात आली असून ती एका सूचनेबरहुकूम लक्ष्याचा वेध घेतील, असे सांगण्यात आले.

संसदिय स्थायी समितीची बैठक बोलवा!

२० जवानांना वीरमरण आलेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षांबाबतची वस्तुस्थिती परराष्ट्र सचिव, संरक्षण सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संसदेच्या स्थायी समितीसमोर ठेवावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी रविवारी केली.

नरेंद्र नव्हे, सरेंडर मोदी- राहुल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवानमध्ये चीनशी झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी शरणागती पत्करल्याची टीका करणारे काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा टीकास्त्र सोडले. खरेतर नरेंद्र मोदी हे नरेंद्र नव्हे, तर सरेंडर मोदी आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी ‘जपान टाईम्स’मधील लेखाचा हवाला देऊन ट्विटरवर लगावला आहे.

निर्णय असे..

* सीमेचे रक्षण करण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली असून सशस्त्र दलांना संपूर्ण सज्जतेचा इशारा.

* प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने आगळीक केल्यास सडेतोड उत्तर देण्याचे सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य.

* चीनने आगळीक केल्यास बंदुका न चालवण्याच्या करारास जवान बांधील राहणार नसल्याचे सूचित.

* परिस्थितीनुसार निर्णयाचे लष्करी अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिल्याची वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याची माहिती.

चीनमधून आयात होणाऱ्या मालाचा तपशील सादर करा!

देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दुय्यम दर्जाच्या उत्पादनांच्या (विशेषत: चीनमधून होणाऱ्या) आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने स्वस्त आयात मालाचा उत्पादननिहाय तपशील सादर करण्याचे आदेश उद्योगसमूहांना दिले आहेत. चीनमधून होणाऱ्या आयातीवर अवलंबून राहणे कमी व्हावे आणि ‘आत्मनिर्भर भारत’ला चालना देण्याबाबतच्या उपायांवर पंतप्रधान कार्यालयात अलीकडेच एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती, असे सूत्रांनी सांगितले.

दारुगोळा, शस्त्रास्त्रे खरेदीसाठी ५०० कोटींच्या खर्चाचे अधिकार 

चीन सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे खरेदीसाठी तीन सेवांना ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या आपत्कालीन खरेदी खर्चाचे विशेष अधिकार दिल्याची माहिती सरकारी सूत्रांनी रविवारी दिली. लष्करी सामुग्री खरेदीतील दिरंगाई टाळण्यासाठी सरकारने काही नियम शिथिल केले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिक कोणत्याही कारवाईसाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने शस्त्रास्त्रे आणि लष्करी सामुग्री खरेदीचे विशेषाधिकार देण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

अमेरिका दोन्ही देशांच्या संपर्कात- ट्रम्प  :  भारत आणि चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्याने अमेरिका दोन्ही देशांच्या संपर्कात आहे. तेथील परिस्थितीवर आमचे लक्ष आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.