Emmanuel Macron breaks silence on Viral Video : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नीने त्यांच्या तोंडावर चापट मारल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची समाजमाध्यमांवर बरीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, मॅक्रॉन यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “हा व्हिडीओ खरा आहे. मात्र, तो ज्या पद्धतीने शेअर केला जात आहे, त्याबाबत जे दावे केले जात आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत.

इमॅन्युएल मॅक्रॉन हे सध्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहेत. व्हिएतनामची राजधानी हनोई येथे ते राजकीय भेटीसाठी गेले होते. हनोई विमानतळावर मॅक्रॉन हे त्यांच्या विमानातून खाली उतरत असताना त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांनी इमॅन्युएल यांच्या तोंडावर चापट लगावल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ब्रिगिट मॅक्रॉन यांनी इमॅन्युएल यांना चापट मारल्यानंतर ते क्षणभर अस्वस्थ झाल्याचे दिसले. तसेच त्यांनी त्यांचा चेहरा देखील लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेर उभ्या प्रसारमाध्यमां प्रतिनिधिंना व फ्रेंच पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभ्या व्हिएतनामच्या प्रतिनिधिंना पाहून त्यांनी स्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं?

या घटनेचा आणखी एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसतंय की इमॅन्युएल यांना चापट मारल्यानंतरही त्यांनी पत्नीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रिगिट यांनी पतीचा हात झटकला. त्यानंतर इमॅन्युएल यांनी स्वत:ला सावरत विमानाच्या बाहेर स्वागत करणाऱ्या प्रतिनिधींना हात दाखवत प्रतिसाद दिला. दरम्यान, या व्हिडीओमुळे मॅक्रॉन दाम्पत्यामध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, इमॅन्युएल यांनी या सर्व अफवांचं खंडण केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओबाबत इमॅन्युएल मॅक्रॉन काय म्हणाले?

व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, “मी तेव्हा माझ्या पत्नीची मस्करी करत होतो, तिला चिढवत होतो. त्यामुळे तिने मला च्येष्टेतच चापट मारली. मात्र, हा काहीतरी जागतिक मुद्दा असल्यासारखी सगळीकडे चर्चा रंगत आहे. काहीजण तर, हा व्हिडीओ माझ्याविरोधात शस्त्राप्रमाणे वापरू पाहत आहेत. तो व्हिडीओ पूर्णपणे खरा आहे. मात्र, काहीजण त्यांच्या काल्पनिक गोष्टी त्या व्हिडीओबरोबर जोडून शेअर करत आहेत आणि अफवा पसरवत आहेत”. दरम्यान, मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की तो त्यांच्या खासगी जीवनातील क्षण होता. त्यावर चर्चा करू नये.