आयसिसचे दहशतवादी फ्रान्सवर रासायनिक किंवा जैविक शस्त्रांच्या साह्याने हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे फ्रान्सचे पंतप्रधान मॅनुएल वॉल्स यांनी गुरुवारी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यांनंतर फ्रान्समध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी आणखी तीन महिन्यांसाठी वाढविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात केली. त्यावेळी त्यांनी हा धोका सदस्यांच्या लक्षात आणून दिला.
गेल्या शुक्रवारी पॅरीसमधील रेस्टॉरंट, कॉन्सर्ट हॉल, नॅशनल स्टेडियम या ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये १३० नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. सीरियातील आयसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर फ्रान्स तातडीने आणीबाणी लागू करण्यात आली होती. वॉल्स म्हणाले, इराक किंवा सीरियामध्ये फ्रान्स काय कारवाई करते आहे, याचे प्रत्युत्तर देण्यासाठी फ्रान्सवर हल्ला करण्यात आलेला नसून, फ्रान्सला लक्ष्य करण्यासाठीच हल्ले करण्यात आलेले आहेत. पुढील काळात रासायनिक किंवा जैविक शस्त्रांच्या साह्याने फ्रान्सवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयसिसने असा कोणताही इशारा फ्रान्सला दिला आहे का, याबद्दल वॉल्स यांनी काहीही सांगितले नाही.
दरम्यान, बेल्जियममध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी तेथील पंतप्रधान चार्ल्स मायकल यांनी गुरुवारी ४० कोटी युरोचे आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली.