French tourist gang rape Lahore: फ्रेंच पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन पाकिस्तानी नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लाहोर उच्च न्यायालयाने बुधवारी आरोपींनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावत मृत्यूची शिक्षा कायम ठेवली. २०२० मध्ये तीन मुलांच्यासमोर फ्रेंच महिला पर्यटकावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना पाकिस्तानमध्ये उघडकीस आली होती.
शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान
फ्रेंच पर्यटक महिलेच्या कारमधील इंधन सामप्त झाल्यानंतर, लाहोर जवळ अबीद अली आणि शफाकत अली या दोन पुरुषांनी पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाला आरोपींनी २०२१ मध्ये लाहोर उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आरोपींवर सामूहिक बलात्कार, अपहरण, दरोडा आणि दहशतवादाशी निगडीत कलमं लावण्यात आली होती.
बंदुकीच्या धाकावर मुलांसमोरच बलात्कार
०९ सप्टेंबर २०२० मध्ये घडलेल्या या घटनेचे पाकिस्तानसह जगभरात तीव्र पडसाद उमटले होते. पाकिस्तान वंशाची फ्रेंच महिला आपल्या तीन मुलांसह सियालकोट-लाहोर मार्गावर प्रवास करत होती. दरम्यान, रात्रीच्या सुमारास महिलेच्या कारमधील इंधन समाप्त झाले. यामुळे मुलांसह महिला रस्त्यातच अडकून पडली. महिला मुलांसह गाडीतच मदतीची वाट पाहत होती. पण, आरोपींनी कारची काच फोडून महिलेला बाहेर ओढत बंदुकीच्या धाकावर मुलांसमोरच तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी महिलेकडील रोख रक्कम, दागिने आणि बँकेचे कार्ड्स देखील चोरी केले.
तपासानंतर सुनावणी
महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी काही दिवसांतच आरोपींनी शोधून अटक केली. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी मोबाईल फोनचा डेटा, घटनास्थळावरील DNA नमुने आणि काही इतर पुराव्यांची मदत झाली. सुनावणी सुरु झाल्यानंतर पीडित महिलेने दोन्ही आरोपींना ओळखले. आरोपींनी देखील गुन्ह्याची कबुली दिली. दहशतवादविरोधी न्यायालयाने मार्च २०२१ मध्ये दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.
उच्च न्यायालयाने कायम ठेवली शिक्षा
शिक्षा ठोठावल्यानंतर आरोपींनी लाहोर उच्च न्यायालयात याला आव्हान दिले होते. मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी सबळ पुरावे नसल्याचे निर्णय बदलण्यात यावा असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केला होता. तर, पीडितेच्या वकिलांनी आरोपींच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचा युक्तिवाद करत सत्र न्यायालयाने सर्व पुराव्यांची पडताळणी केल्याचे उच्च न्यायालयात सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयाने आरोपींची याचिका फेटाळून लावत मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली.
