फ्रान्सची राजधानी पॅरिसमधून मुंबईत आलेल्या २३ वर्षीय नकोने या शहरातील आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. नोकरीनिमित्त मुंबईत स्थलांतर केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच त्याला शहरातील जीवनशैलीतील अनेक गोष्टी नव्या वाटल्या. यापैकी तीन गोष्टींबद्दल आपल्याला कुणीच आधी सांगितलं नव्हतं, असे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र त्याला अपेक्षित नव्हती, ती म्हणजे तो नकळत मुंबईच्या प्रेमात पडेल.
‘५ किलोमीटर म्हणजे नेमकं किती?’
मुंबईत आल्यानंतर सर्वात मोठा बदल जाणवला तो म्हणजे अंतराकडे पाहण्याचा दृष्टिकोन. पॅरिसमध्ये ५ किलोमीटर हे तुलनेने सहज पार करता येणारे अंतर असले, तरी मुंबईत ५ किलोमीटरचा प्रवास म्हणजे नेमकं किती वेळ लागेल, हे परिस्थितीनुसार बदलू शकते, असे नकोने सांगितले. मुंबईतील वाहतूक लक्षात घेऊन दिवसाचं नियोजन करावं लागत असल्याचेही त्याने नमूद केले. त्याचबरोबर उकाडा, चहा आणि चांगलं जेवण शोधणे हेही त्याच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनले आहे.
‘नॉर्मल लाइफ’ची व्याख्याच बदलली
मुंबईत आल्यानंतर आपल्या ‘सामान्य आयुष्या’ची व्याख्याच बदलली, असे नको म्हणतो. पॅरिसमधील जीवनशैली आणि मुंबईतील दैनंदिन जीवन यात मोठा फरक असल्याचे त्याला जाणवले. तो म्हणतो, “मी २३ वर्षांचा आहे. पॅरिसपासून ७ हजार किलोमीटर दूर मुंबईत आलो, नवीन नोकरी सुरू केली, पूर्णपणे नवीन लोकांना भेटलो आणि मुळापासून एक नवीन आयुष्य उभे करावे लागले.”
मुंबईत येऊन तीन आठवड्यांचा काळ लोटला असला, तरी आजही तो शहरात कधीकधी रस्ता चुकतो. सध्या तो हिंदी भाषा शिकत असून, दर आठवड्याला नवीन ठिकाणांचा शोध घेत आहे. अनेकदा “आपण मुंबईत आलो तरी कसे?” असा प्रश्न स्वतःलाच पडतो, मात्र हा अनोखा अनुभव त्याच्या नव्या आयुष्याचाच एक भाग असल्याचे त्याने सांगितले.
“मला या शहराच्या प्रेमात पडेन असं वाटलं नव्हतं”
मुंबईत जुळवून घेताना अनेक आव्हाने आली असली, तरी या शहराबद्दलचे आपले प्रेम वाढत असल्याचे निकोने सांगितले. “कधी कधी सर्वात चांगला निर्णय तोच असतो, जो तुम्ही घरी असलेल्या प्रत्येकाला समजावून सांगताना अजिबात अर्थपूर्ण वाटत नाही,” असे त्याने म्हटले. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुंबईतील अनेक अनुभवांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. गणेश विसर्जनातील उत्सवापासून समुद्रकिनारा, शहरातील विविध भाग आणि मुंबईची संस्कृती अनुभवतानाचे अनेक क्षण त्याने शेअर केले आहेत.
मुंबईतील नव्या आयुष्याची सोशल मीडियावर चर्चा
नकोच्या इन्स्टाग्रामवर सुमारे दोन हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो लाइफस्टाइल, फॅशन, ट्रॅव्हल आणि फूडशी संबंधित कंटेंट शेअर करतो. पॅरिसमधून मुंबईत आलेल्या या तरुणाचा शहराशी जुळवून घेण्याचा अनुभव आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रॅफिक, अंतर, हवामान आणि रोजच्या धावपळीच्या पलीकडे जाऊन मुंबईतील लोक, संस्कृती आणि नव्या अनुभवांनी त्याला या शहराशी जोडून घेतले आहे.
