केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बलात्कार पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बलात्कारानंतर होणाऱया वैद्यकीय तपासणीत काही नव्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या बदलानंतर ‘टू फिंगर’ चाचणी ही वादग्रस्त व अपमानास्पद पद्धत बंद होणार आहे. नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक रुग्णालयाला बलात्कार पीडित महिलेच्या न्यायवैधक आणि वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष उभारण्याच्या सुचना दिल्या आहेत. आरोग्य विज्ञान विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था व देशातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात आली आहेत. वैद्यकीय चाचणीबरोबरच, बलात्कार पीडितेस बसलेल्या मानसिक धक्‍क्‍यातून सावरण्यास मदत करण्यासाठीही नवी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही तत्त्वे बलात्कार पीडितेच्या उपचारासाठी कार्य करणाऱ्या सर्व रुग्णालयांना उपलब्धही करुन देण्यात आली आहे. या तत्त्वांतर्गत डॉक्‍टर पीडितेची चाचणी करत असताना इतर कोणीही व्यक्ती तेथे उपस्थित असू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत.