पीटीआय, नवी दिल्ली

‘यूजी-नीट २०२४’ परीक्षेमधील कथित अनियमिततांची चौकशी करण्यासाठी ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’ला निर्देश देण्यात यावेत अशी मागणी करणारी एक नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका परीक्षा दिलेल्या १० विद्यार्थ्यांनी दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास जलद करावा यासाठी बिहार पोलिसांना निर्देश देण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.

अलिकडेच या विषयावरील अन्य याचिकेच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ आणि इतरांना नोटीस बजावली आहे. देशभरात ५ मे रोजी घेतलेली परीक्षा रद्द करावी आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी त्या याचिकेत केली आहे.

हेही वाचा >>>पेट्रोल-डिझेलबाबत निर्णय राज्यांच्या हाथी; जीएसटी कक्षेत आणण्याबाबत अर्थमंत्र्यांचे आवाहन

‘नीट’मधील अनियमितेवरून देशभरात विविध ठिकाणी कारवाई केली जात आहे. बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघर येथून सहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शनिवारी दिली. तसेच बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेली कागदपत्रे पडताळून पाहण्यासाठी शनिवारी ‘नीट’च्या प्रश्नपत्रिका मिळवल्या. या प्रकरणी नार्को विश्लेषण आणि ब्रेन मॅपिंग चाचणीही केली जाऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.