Manipur Violence : मागील एका वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या घटानांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशातच शुक्रवारी कुकी सशस्र गटाकडून बिष्णुपूर जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यानंतर आज पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
वृद्ध नागरिकाच्या हत्येनंतर हिंसाचाराची घटना
इंडियन एक्सप्रसने दिलेल्या वृत्तानुसार, आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कुकी सशस्र गटाने आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास निंगथेम खुनौ भागात राहणाऱ्या मैतेई समाजाच्या एका ६३ वर्षीय वृद्ध नागरिकाची घरात घुसून हत्या केली होती. तसेच त्यांनी त्या परिसरात अंदाधुंद गोळीबारही केला होता. त्यानंतर दुपारी मैतेई सशस्र गटाने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा – “शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
जिरीबाम जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता
यावेळी उफाळलेल्या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन संशयित कुकी सशस्र गटाचे अतिरेकी तर दोन मैतेई सशस्र गटाच्या अतिरेक्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं असून सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर केला होता रॉकेट हल्ला
दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास कुकी अतिरेक्यांनी मणिपूरचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मारेम्बम कोईरेंग यांच्या घरावर रॉकेट बॉम्बने हल्ला केला होता. या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू, ५ जण जखमी झाले होते. एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, रॉकेट घराच्या भिंतीवर आदळले आणि लगेचच त्याचा मोठा स्फोट झाला होता. कुकी-झोमी बहुसंख्य चुराचंदपूर जिल्ह्यात उंच स्थानांवरून ट्रोंगलाओबीच्या सखल निवासी भागाकडे अशा प्रकारचे रॉकेट डागण्यात आले होते.
हेही वाचा – Manipur Drone Attack : मणिपूर हादरलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी
पश्चिम इम्फाळमध्येही अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्ब हल्ले
गेल्या आठवड्यात मणिपूरच्या पश्चिम इम्फाळ जिल्ह्यातील काही भागात अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्ब हल्ले केले होते. या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू, तर १० जण गंभीर जखमी झाले होते. तसेच या गोळीबाराच्या आणि बॉम्ब हल्ल्यामध्ये स्थानिक नागरिकांच्या अनेक घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं.
मणिपूरमध्ये आज शाळा बंद
मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने आज ( ७ सप्टेंबर) राज्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शुक्रवारी शिक्षण मंत्रालयाने एक आदेश जारी केला असून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि केंद्रीय शाळा ७ सप्टेंबर रोजी बंद राहतील असं आदेशात म्हटलं आहे.