येत्या १ ऑक्टोबरपासून अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट सामान्य माणसाच्या जीवनावर होणार आहे. १ ऑक्टोबरपासून स्टेट बँक ऑफ इंडियाचे नियम, मोबाईल कॉलचे दर यांमध्येदेखील बदल होणार आहेत. या बदलांची माहिती जाणून घेतल्यास सर्वसामान्यांना त्याचा मोठा फायदा होईल.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकांचे चेक ३० सप्टेंबर २०१७ पासून स्वीकारले जाणार नाहीत. काही दिवसांपूर्वीच एसबीआयने ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली होती. ग्राहकांनी नव्या चेकबुकसाठी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम किंवा बँक शाखेतून अर्ज करावेत, असे एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक आणि त्रवणकोर या एसबीआयच्या सहयोगी बँका आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने बँक खात्यातील किमान शिल्लक रकमेच्या मर्यादेत बदल केला आहे. याआधी एसबीआयने सरासरी मासिक शिल्लक (एमएबी) रक्कम ५ हजार रुपये इतकी निश्चित केली होती. त्यामुळे ग्राहकाला बँक खात्यात किमान ५ हजार रुपये ठेवणे बंधनकारक होते. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला असून बँक खात्यात किमान ३ हजार रुपयेच ठेवावे लागणार आहेत. ३ हजारांची किमान मर्यादा शहरी भागातील खातेदारांसाठी असणार आहे. निमशहरी आणि ग्रामीण भागांसाठी ही मर्यादा अनुक्रमे २ हजार आणि १ हजार अशी असेल.

१ ऑक्टोबरपासून मोबाईल कॉलचे दरदेखील कमी होण्याची शक्यता आहे. ट्रायकडून इंटरकनेक्शन चार्जेस कमी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याने कॉल दर कमी होऊ शकतात. ट्रायने इंटरकनेक्शन चार्जेस १४ पैशांवरुन ६ पैशांवर आणले आहेत. याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो. यासोबतच १ ऑक्टोबरपासून दुकानदारांना कोणतीही वस्तू जुन्या एमआरपीनुसार विकता येणार नाही. ३० सप्टेंबरपर्यंत जुने सामान विकण्याची परवानगी दुकानदारांना देण्यात आली आहे. यानंतर एखाद्या दुकानदाराने जुन्या एमआरपीनुसार सामानाची विक्री केल्यास त्याविरोधात कारवाई होऊ शकते.