२३ डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून चेन्नईत लोकल सुरु केली जाणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली आहे. चेन्नईत उपनगरीय लोकल सेवेला उद्यापासून नॉन पिक अवर्समध्ये सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास संमती देण्यात आली आहे. गर्दीच्या वेळा टाळून ज्या वेळा असतात त्या वेळी सर्व प्रवासी लोकल प्रवास करु शकतात असं पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. चेन्नईत लोकल सुरु झाल्यानंतर आता मुंबईत लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

मार्च महिन्यात संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाला. त्यानंतर लोकल सेवा आणि रेल्वे सेवाही बंद करण्यात आल्या. मात्र नंतर हळूहळू अनलॉक करत असताना लांबच्या प्रवासासाठी रेल्वे सुरु झाल्या. तसंच मुंबईतही लोकल सेवा सुरु करण्यात आली मात्र ती फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी. त्यानंतर हळूहळू वकिलांना, शिक्षकांना संमती देण्यात आली. तसंच महिलांनाही नवरात्रापासून लोकल सेवेची मुभा देण्यात आली. मात्र सर्वसामान्यांसाठी लोकल अजूनही सुरु झालेली नाही. त्यामुळे चेन्नईत लोकल सुरु झाल्यानंतर आता मुंबईत सगळ्यांसाठी लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

मुंबईतली लोकल सेवा म्हणजे मुंबईकरांची जीवन वाहिनी. मात्र अद्याप पर्यंत ही लोकल सेवा सरसकट सगळ्यांसाठी सुरु झालेली नाही. ठाकरे सरकारने यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आणि रेल्वे मंत्रालयाला पत्रही लिहलं आहे. लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची मागणीही त्यात करण्यात आली आहे. मात्र या पत्रानंतरही मुंबईत लोकल कधी सुरु होणार हे स्पष्ट झालेलं नाही. आता चेन्नईत लोकल सुरु होते आहे. नॉन पिक अवर्समध्ये म्हणजेच गर्दी नसण्याच्या वेळांमध्ये सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. करोना प्रतिबंधाचे सगळे नियम पाळणं यासाठी बंधनकारक आहे. ही बातमी समोर आल्यानंतर आता मुंबईत लोकल सेवा सरसकट सगळ्यांसाठी कधी सुरु होणार हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.