निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी या पक्षामधून त्या पक्षामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यासही सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपानेही आपल्या उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या आहेत. अनेक ठिकाणी भाजपाने प्रस्थापितांना तिकीट नाकरले असून नवख्या लोकांना संधी दिली आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यासारख्या दिग्गजांनाही भाजपाने तिकीट नाकराले आहे. तिकीट नाकरलेल्या दिग्गजांच्या यादीमध्ये झारखंडमधील कारीया मुंडा यांचाही समावेश आहे. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर आता आपण राजकारणातून संन्यास घेऊन पुन्हा शेतकीकडे वळणार असल्याचे कारीया यांनी जाहीर केले आहे.

करीया हे लोकसभेचे माजी उप सभापती असून ते आठ वेळा लोकसभेत निवडणून गेले आहेत. मात्र भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये कारीया यांच्या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अर्जून मुंडा यांना तिकीट दिले आहे. या निर्णयामुळे कारीया यांनी आता सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

करीया हे १९७७ साली पहिल्यांना लोकसभेमध्ये निवडूण गेले होते. त्यानंतर २००९ साली ते लोकसभेचे उप- सभापती झाले. पक्षाने तिकीट नाकरल्यानंतर पत्रकारांनी करिया यांना यासंदर्भात विचारले असता, ‘मी शेतकरी होतो. तेथून राजकारणात आलो आणि लोकसभेत निवडूण गेलो. आता पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मी पुन्हा शेती करणार आहे. मी लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो होतो. राजकारणात येण्यामागे वैयक्तिक फायदा घेण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. देवाने मला खूप काही दिली आहे.’ शेती करण्याचा निर्णय करिया यांनी घेतला असला तरी पक्षाने तिकीट नाकारल्याने ते नाराज आहेत. मात्र आता पक्षानेच तिकीट नाकारल्याने त्यांनी पुन्हा शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

करिया हे झारखंडच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. २००० साली जेव्हा बिहारपासून वेगळं होत झारखंडची निर्मिती झाली तेव्हा करिया यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. त्यानंतर जवळजवळ दोन दशकांनी भाजपाने करिया यांना आराम देण्याचा निर्णय घेत उमेदवारी नाकारली आहे.